हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर दिसतात 'ही' लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 04:41 PM2024-06-20T16:41:11+5:302024-06-20T16:46:39+5:30
Symptoms of Blocked Arteries: हार्ट अटॅकचं एक मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या धमण्या ब्लॉक होणं. या धमण्या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात.
Symptoms of Blocked Arteries: बदलती लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल लोक अनेक गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. जगात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. कमी वयात लोकांना हार्ट अटॅक येत आहे. हार्ट अटॅकचं एक मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या धमण्या ब्लॉक होणं. या धमण्या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात. त्या ब्लॉक झाल्याने रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे हृदयाला पुरेसं ऑक्सिजन पोहोचत नाही. अशात हार्ट अटॅक आणि इतर हृदयरोगांचा धोका वाढतो.
हृदयाच्या नसांमध्ये काही ब्लॉकेज असेल तर शरीरात काही लक्षण दिसू लागतात. ही लक्षण वेळीच ओळखली तर हार्ट अटॅक आणि हृदयरोगांचा धोका टाळता येऊ शकतो. अशात आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर शरीरात काय लक्षण दिसतात ते सांगणार आहोत. जेणेकरून वेळीच तुम्ही सावध व्हाल आणि योग्य ते उपचार घेऊ शकाल.
जास्त घाम येणे
एक्सरसाइज केली किंवा एखादं जड काम केलं तर घाम येणं सहाजिक आहे. पण काही न सतत जास्त घाम येत असेल किंवा थंड घाम येत असेल तर वेळीच सावध व्हा. हृदयाच्या नसा ब्लॉक असल्यानेही जास्त घाम येऊ शकतो.
चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज असेल तर पुन्हा पुन्हा चक्कर येण्याची समस्या होते. कधी कधी व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. नसांमध्ये ब्लॉकेज असल्याने असं होतं. वेळीच डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार घ्यावे.
छातीत वेदना
सतत छातीमध्ये वेदना किंवा जडपणा वाटत असेल तर हे हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्याचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला नेहमीच छातीत दुखत असेल किंवा जडपणा, जळजळ वाटत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांना दाखवा.
श्वास घेण्यास समस्या
हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर सामान्यपणे श्वास घेण्यास अडचण येते. जेव्हा रक्तप्रवाह सुरळीत नसतो तेव्हा शरीरात योग्यपणे ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते. अशावेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
जास्त थकवा
विनाकारण सतत थकवा जाणवत असेल तर हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज असल्याचा संकेत असू सकतो. जर पौष्टिक आहार आणि पुरेसा आराम केल्यावरही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा आणि आवश्यक त्या टेस्ट करून घ्या.
हृदय कसं निरोगी ठेवावं
- तंबाखूचं सेवन बंद करा
- दारूचं सेवन बंद करा
- डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी त्यांची नियमित टेस्ट करा.
- जास्त तणाव घेऊ नका
- दररोज कमीत कमी ७ ते ८ तास चांगली झोप घ्या
- हेल्दी फूड खा, जास्त मीठ खाऊ नका.
- वजन कंट्रोलमध्ये ठेवा.
- नियमितपणे एक्सरसाइज करा.