Heart Attack : कदाचित तुम्हालाही येऊन गेला असेल सायलेंट हार्ट अटॅक, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:56 PM2021-12-18T17:56:11+5:302021-12-18T17:56:21+5:30
Silent Heart Attack : सायलेंट हार्ट अटॅकमध्ये फार असामान्य किंवा कोणतंही लक्षण दिसत नाही. अशाप्रकारचा हार्ट अटॅक फारच धोकादायक असू शकतो.
काही खास लक्षणे असतात जी हार्ट अटॅकचा इशारा देतात. जसे की छातीत वेदना-कळ, थंडी वाजण्यासोबत घाम येणे आणि फार जास्त कमजोरी वाटणे. पण तुम्हाला माहीत आहे का की, हार्ट अटॅक विना लक्षणेही येऊ शकतो. कदाचित असंही होऊ शकतं की कधी ना कधी तुम्हालाही हार्ट अटॅक आला असेल आणि तुम्हाला कळालंच नाही. यालाच सायलेंट हार्ट अटॅक (Silent Heart Attack) असं म्हणतात. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये फार असामान्य किंवा कोणतंही लक्षण दिसत नाही. अशाप्रकारचा हार्ट अटॅक फारच धोकादायक असू शकतो.
काय आहे सायलेंट हार्ट अटॅक?
अमेरिकेतील क्वीवलॅंड क्लीनिकचे कार्डिओलॉजिस्ट कर्टिस रिम्मरमॅन यांच्यानुसार, सायलेंट हार्ट अटॅकचा सर्वात मोठा धोका हा असतो की, काही कळूनच येत नसल्याने लोक यावर उपचारही करू शकत नाहीत. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये भलेही याची लक्षणे दिसत नसली तरी याने तुमच्या हृदयाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे यावर लक्ष देणं गरजेचं आहे.
सायलेंट हार्ट अटॅकची माहिती कशी मिळते?
ज्या लोकांना हार्ट अटॅक आला हे समजत नाही, त्यांना काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी याबाबत समजतं जेव्हा ते रेग्युलर चेकअपसाठी आपल्या डॉक्टरकडे जातात. हृदयाच्या मांसपेशींचं किती नुकसान झालं. हे बघून डॉक्टर सांगतात की, तुम्हाला कशाप्रकारचा हार्ट अटॅक आला असेल. यासाठी डॉक्टर इलेक्ट्रोकार्डियोग्राम किंवा कार्डियक अल्ट्रासाउंडच्या माध्यमातून याची माहिती मिळवतात. काही लोक सायलेंट हार्ट अटॅकनंतर लगेच डॉक्टरकडे जातात. कारण त्यांना थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास अशा समस्या होऊ लागतात. सायलेंट हार्ट अटॅक तसा तर कुणालाही येऊ शकतो. पण महिला आणि डायबिटीस रूग्णांना याचा धोका जास्त राहतो.
या लक्षणांवर द्या लक्ष
सायलेंट हार्ट अटॅकमध्ये खास लक्षणे नाहीत दिसत. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही याचे संकेत ओळखू शकत नाहीत. छातीत तणाव, फार जास्त थकवा जाणवणे, एखादं काम केलं तर धाप लागणे, हृदयात जळजळ होणे, अपचन आणि सतत अस्वस्थता जाणवणे हे सायलेंट हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात. अनेकदा लोकांना वाटतं की, त्यांच्यासोबत काहीतरी बरोबर होत नाहीये. त्यांना यावर विश्वास ठेवायचा नसतो की, हा हार्ट अटॅकही असू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करावा.