5 तासापेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसत असाल तर सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 03:21 PM2017-09-02T15:21:46+5:302017-09-02T15:21:53+5:30
तासंतास टिव्ही पाहत एकाच जागी बसणार्यांचं प्रमाण वाढतं आहे, त्यात बैठय़ा नोकर्या, भविष्यात आपल्याला चालता येईल का?
नितांत महाजन
काय एका जागी बसलाय, हालचाल कर की जरा. हातपाय हलव, पाय मोकळे कर, असं सांगणारे वडिलधारे तरुणांच्या रागाचे धनी होतात हे खरं आहे. पण अमेरिकेत वाशिंग्टन विद्यापीठाने अलिकडेच केलेला एक अभ्यास म्हणतो की दिवसाला पाच तासापेक्षा जास्त काळ बसून जे बसून असतात त्यांना वाढत्या वयात मोबिलिटी डिसॅबिलीटीचा अर्थात चालण्याफिरण्याचा त्रास होऊ शकतो.
अमेरिकेत हा अभ्यास झाला तो विशेषतर् 50 ते 71 या वयोगटाचा. सलग 10 वर्षे त्यांच्या चलनवलनाचा अभ्यास करण्यात आला. त्यातून असं सिद्ध झालं की जे दिवसाला 5 तास किंवा त्याहून अधिक काळ बसून असतात त्यांचं चालणं, हालचाल मंदावलेली किंवा अगदीच बंद झालेली दिसते.
गेल्याच महिन्यात इंग्लंडमध्येही असाच एक अभ्यास प्रसिद्ध झाला त्यांचं म्हणणं की, जे लोक दिवसाला 2 तासापेक्षा कमी काळ बसून असतात ते जास्त अॅक्टिव्ह असतात. उतारवयातही त्यांच्या हालचाली मंदावत नाहीत.
मात्र सर्वच वयोगटातील माणसांचं बैठं काम किंवा बसून राहण्याची सवय वाढलेली आहे. त्यामुळे अनेकांना तरुण वयातच पायदुखीपासून अनेक आजार सतावत आहेत.
यावर उपाय म्हणून रोज किमान 10 मिनिटं तरी चालायलाच हवं असं हे अभ्यास आग्रहानं सांगत आहेत.