तासन्-तास एका जागी बसणं हृदयासाठी धोकादायक; तुम्हीही बैठं काम करत असल्यास सहा पथ्यं पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 02:22 PM2022-08-24T14:22:47+5:302022-08-24T14:28:18+5:30
अनियमित आहार त्यातून होणारा पित्ताचा त्रास यामुळेसुद्धा हृदयविकार जडू शकतो. त्यामुळे जेवणाची वेळ दररोज एकसारखी असली पाहिजे.
कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना जवळपास सगळ्यांसाठीच लागू झाली. त्यामुळे तासनतास एकाच जागी बसून काम करण्याची बहुतेकांना सवय जडली. त्यामुळे नोकरदारांचे काम कंपनीसाठी अधिक जास्त होत असले तरीसुद्धा त्यांच्या हृदयासाठी ही सवय महागात पडणार आहे, असा इशाराच डॉक्टरने दिला आहे.
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये वयाच्या चाळिशीत असतानाच हृदयविकाराचा झटका येण्याची प्रमाण प्रचंड वाढले आहे. इतक्या कमी वयात हृदयविकार जडणे याला सर्वात मोठे कारण आहे ते तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करण्याचे आणि त्यानंतर आहाराचे. त्यामुळे हृदयाचे काम सुरळीत चालायचे असेल तर आहारातील तेलाचे प्रमाण आणि नियमित चालणे एकाच ठिकाणी तासनतास बसून न राहणे हे उपाय तरुणांना करावेच लागणार आहे.
असे आहेत उपाय
रक्तदाब, मधुमेह, दमा, थायरॉईड या व्याधी ज्यांना असतील त्यांनी हृदयविकारापासून वाचण्यासाठी नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. अनियमित आहार त्यातून होणारा पित्ताचा त्रास यामुळेसुद्धा हृदयविकार जडू शकतो. त्यामुळे जेवणाची वेळ दररोज एकसारखी असली पाहिजे. ज्यांना एका ठिकाणी बसून तासनतास काम करावे लागते. त्यांनी पर्याय म्हणून काही वेळ का होईना उभे राहून काम करणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.
नियमित चालणे सर्वोत्तम उपाय
धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सर्वांनाच व्यायामासाठी वेळ काढणे कठीण असते. मात्र, नियमित आणि संधी मिळेल तेव्हा चालणे हासुद्धा उत्तम व्यायाम ठरू शकतो. विशेषतः जिना उतरणे-चढणे त्याचबरोबर दुपारचे आणि रात्रीचे जेवण झाल्यानंतर शतपावली करणे, हेसुद्धा आरोग्याला हिताचे ठरते.
हे टाळा
>> तासनतास खुर्चीत बसून राहणे
>> जेवण केल्या केल्या झोपणे
>> सातत्याने लिफ्टचा वापर करणे
>> श्वसनाचा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करणे
>> तळून झालेल्या तेलाचा वापर पुन्हा पुन्हा करणे
>> अनियमित जेवण करणे.
हृदयविकार टाळण्यासाठी पोहणे, धावणे हा सर्वोत्तम व्यायामाचा प्रकार आहे. त्याचबरोबर योगासन आणि त्यातही श्वसनाची विविध आसने यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालते. हृदय कमकुवत होत नाही. त्यामुळे अनुलोम-विलोम यासारखे योगासन करणे सोपे व फायद्याचे ठरेल.
- डॉ. संजय क्षीरसागर, कात्रज