परीक्षेपूर्वी 'ही' गोष्ट नक्की करा, कठिणातली कठीण पेपरमध्येही व्हाल पास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:41 PM2018-12-08T16:41:58+5:302018-12-08T16:44:28+5:30
परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं.
परीक्षेमध्ये नापास होण्याची भीती केवळ लहान मुलांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही सतावत असते. प्रत्येक आईवडिलांना आपलं मुल परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हावं,असं वाटत असतं. जास्त गुण मिळवण्याच्या हट्टापायीच मुलांवर अभ्यासाचा अधिक ताण येतो.
एवढंच नाही तर परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवण्याच्या इच्छेमुळे काही मुलांमध्ये नैराश्याचं प्रमाणही वाढतं. यामुळे, परीक्षेत नापास झाल्यास काही मुलं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतात.
परीक्षेच्या काळात दिवसरात्र जागं राहून कित्येक मुलं अभ्यास करतात. पालकही आपल्या मुलांना जमेल तशी आणि तेवढी मदत करतात. पण खरंतर एवढी ओढाताण करुन अभ्यास करण्याची खरंच गरज नाहीय. वेळच्या वेळी प्रत्येक विषयाचा अभ्यास केल्यास रात्रीचे जागरण करावेच लागणार नाही. शिवाय, अभ्यासाची उजळणी होण्यासही मदत होईल. यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होणार नाही.
आपल्या मुलांनी ताणतणाव न घेता परीक्षेत पास व्हावं,अशी इच्छा असल्यास त्यांना परीक्षेच्या काळात रात्रीची पुरेशी झोप घ्यायला सांगा. आरोग्य निरोगी राहण्यासाठी झोपदेखील तितकीच महत्त्वाची आहे. परीक्षेच्या काळात जागरण न करता पुरेशा प्रमाणात झोप झाल्यास मुलांच्या गुणांमध्ये सुधारणा होते, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे.
अमेरिकेच्या बायलर विश्वविद्यालयातील संशोधकांनी, विद्यार्थ्यांना '8 तासांची कसोटी' या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केलं होतं. यामध्ये त्यांना परीक्षेच्या आठवड्यात कमीतकमी आठ तासांची झोप पूर्ण केल्यावर काही गुण देण्यात आले. ज्या मुलांनी हे आव्हान पार पाडलं, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळाले, असं निरीक्षण संशोधनाच्या माध्यमातून नोंदवण्यात आले.
बायलर विश्वविद्यालयातील मायकल स्कुलिन यांनी सांगितले की, योग्य प्रमाणात झोप घेतल्यानं परीक्षेत नुकसान होण्याऐवजी फायदाच होतो. परीक्षेच्या काळात एकतर अभ्यासाशी तडजोड करावी किंवा झोपेशी, असा अनेक विद्यार्थ्यांचा समज असतो. परंतु संशोधनातून विद्यार्थ्यांच्या विचारानुसार अगदी विरुद्ध गोष्टी सिद्ध झाल्या.
विश्वविद्यालयातील अभ्यासक प्रो.एलिस किंग यांनी सांगितले की, रात्रीचं जागरण करुन शाळेनं दिलेला अभ्यास पूर्ण करणं ही बाब योग्य नाही, याची माहिती विद्यार्थ्यांना असते. पण, जागरणाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही, असा गैरसमज मुलं करुन रात्रीची पुरेशी झोप घेत नाही. पण वेळेच्या वेळी दिलेला गृहपाठ केल्यास रात्रीचे जागरण करण्याची समस्या निर्माणच होणार नाही, ही गोष्ट समजल्यास विद्यार्थीवर्ग अभ्यासात नक्कीच चांगले गुण प्राप्त करू शकेल.