ऑफिसमध्ये ‘झोपा’- तुमचा पगार वाढेल !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 10:11 AM2022-11-17T10:11:32+5:302022-11-17T10:14:16+5:30
Sleep: काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला पुरेशी झोप घेता आली नाही, तर अगदी पाच-दहा मिनिटांची ‘पॉवर नॅप’ही आपल्याला कशी ऊर्जा देऊन जाते, हे आपण मागच्या लेखात पाहिलं.
काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला पुरेशी झोप घेता आली नाही, तर अगदी पाच-दहा मिनिटांची ‘पॉवर नॅप’ही आपल्याला कशी ऊर्जा देऊन जाते, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. ‘पॉवर नॅप’च्यासंदर्भात नॅशनल स्लीप फाउंडेशननेही विस्तृत अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासानुसार एखाद्यानं अर्धा तास किंवा चाळीस मिनिटे पॉवर नॅप घेतली, तरी त्याची कार्यक्षमता तब्बल ३४ टक्क्यांनी वाढते. फक्त अर्ध्या तासाच्या आरामानं कर्मचाऱ्यांची उत्पादकता इतकी वाढत असेल, तर त्यासाठी कंपन्यांनीही खास डुलकीसाठीचा वेळ आपल्या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे.
काही मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना खास झाेपण्यासाठी, आरामासाठी असा वेळ देतात. त्या काळात कर्मचारी ‘पॉवर नॅप’ घेतात. यामुळे अनेकांची कार्यक्षमता वाढली आणि त्यांचा पगारही! कर्मचाऱ्यांची पुरेशी झोप झालेली नसल्यास त्याचा थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होतो, ही बाबदेखील आता अभ्यासातून स्पष्ट झाली आहे. कंपन्यांची पॉलिसी ‘स्लीप फ्रेंडली’ असल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ३० टक्क्यांपेक्षा जास्त वाढते. एवढंच नाही, या छोट्याशा झोपेमुळे आपली सजगताही थेट शंभर टक्क्यांपर्यंत वाढते. कर्मचारी आणि कंपनी या दोघांसाठीही हा फायद्याचा सौदा आहे. पॉवर नॅपमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणचं वातावरणही अमूलाग्र बदलून जातं.
पॉवर नॅप नेमकी घ्यायची कशी?
१ - तज्ज्ञांच्या मते दुपारी दोन ते चार या वेळेत जर पॉवर नॅप घेतली, तर त्याचा अधिक फायदा होतो. तुमची सजगता, उत्पादकता, स्मरणशक्ती, कार्यक्षमता आदी अनेक गोष्टींमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसतो.
२ - तुम्ही किती वेळ पॉवर नॅप घेता, यावरही त्याचा फायदा अवलंबून आहे. खूप कमी आणि खूप जास्त वेळ पॉवर नॅप घेतली, तर उलट त्याचे दुष्परिणामच दिसून येऊ शकतात. त्यामुळे पॉवर नॅप जास्तीत जास्त १५ ते ३० मिनिटेच घ्यावी.
३ - लक्षात ठेवा, जिथे तुम्ही पॉवर नॅप घेता आहात, ती जागा थोडी थंड, अंधारी असावी. खोलीत फार प्रकाश असेल तर डोळ्यांवर कापडी पट्टी ठेवावी किंवा आय मास्क लावावा. आजूबाजूला गोंगाट असल्यास कानाला इयर प्लगही तुम्ही लावू शकता.