नवे संशोधन; दिव्याच्या प्रकाशात झोपल्यामुळे होतो मधुमेह !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:11 AM2022-03-31T08:11:21+5:302022-03-31T08:11:40+5:30
नवे संशोधन; हृदयविकार तसेच अकाली निधनाचाही धोका
वॉशिंग्टन : झोप घेण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. काही लोकांना गुडुप अंधारात, तर काही जणांना थोड्याशा प्रकाशात झोप घेणे आवडते. ज्यांना दिव्याच्या उजेडातच झोपी जाण्याची सवय आहे, त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष अमेरिकेतील नव्या संशोधनातून काढण्यात आला. अशा लोकांना टाइप-२ मधुमेह, हृदयविकार होण्याची शक्यता असते.
नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसीनच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. माणूस झोपी गेला की त्याच्या पापण्या मिटलेल्या असतात. मात्र, दिव्याच्या उजेडात झोपण्याची सवय असलेल्यांच्या डोळ्यांद्वारे प्रकाश शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे हृद्याचे ठोके, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे भविष्यात त्या व्यक्तीला हृदरोग व टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका संभवतो असे शास्त्रज्ञांनी या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे.
दिवसा हृद्याच्या ठोक्यांचे प्रमाण अधिक असते व रात्री ते कमी असते. अमेरिकी शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात सामील असलेल्या लोकांपैकी जे रात्री दिव्यांच्या प्रकाशात झोपी गेले, त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्यामुळे भविष्यात अशा लोकांचे अकाली निधन होण्याचाही धोका असतो. रात्री आपला मेंदू शरीरातील अनेक क्रिया पुन्हा मार्गावर आणण्याचे किंवा त्यात दुरुस्तीचे करीत असतो. त्यामुळे रात्री हृदयाच्या ठोक्यांची गती कमी झालेली असते.
दिव्याच्या प्रकाशात झोपी जाणाऱ्या व्यक्तींमध्ये सकाळी रक्तात
साखरेचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. (वृत्तसंस्था)
ही घ्या खबरदारी...
n खोलीत संपूर्ण अंधार करून झोपी जाणे शक्य नसेल तर अगदी कमी उजेड देणारा दिवा लावा.
n लाल, केशरी रंगाचे दिवे डोळ्यांवर जास्त परिणाम करीत नाहीत. मात्र, व्हाईट किंवा निळ्या रंगाचे दिवे लावू नका. यापैकी काहीच शक्य नसेल तर झोपताना आय मास्क लावा. त्यामुळे रात्री दिव्याच्या प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण होईल व प्रकृतीवरही परिणाम होण्याचे टळेल.