सावधान... अति झोपणं जिवावरही बेतू शकतं; जाणून घ्या कसं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 16:14 IST2018-12-08T16:13:39+5:302018-12-08T16:14:59+5:30
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होणे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक बाब असते. रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात.

सावधान... अति झोपणं जिवावरही बेतू शकतं; जाणून घ्या कसं?
नवी दिल्ली - दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होणे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक बाब असते. रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. उदाहरणार्थ तणाव, चिंताग्रस्त, डोकेदुखी, अपचन, थकवा इत्यादी शारीरिक तसंच मानसिक त्रास होऊ लागतात. पण लक्षात ठेवा पुरेशी झोप घेणे याचा अर्थ खूप वेळ झोपून राहणं, असा होत नाही. गरजेहून अधिक झोप घेतल्यास याचाही विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. गरजेपेक्षा जास्त वेळ झोपणे कदाचित तुमच्या जिवावरही बेतू शकते, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे.
रात्री सहा ते आठ तासांपेक्षा अधिक झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयरोगासंबंधी आजार (Cardiovascular Diseases) होण्याची शक्यता असते आणि मृत्यूचा धोकाही वाढतो. जी लोक 8 तासांहून अधिक झोप घेतात, त्यांना हृदयसंबंधित रोग उदाहरणार्थ हृदयविकाराचा झटका येणे, हृदयाची प्रक्रिया बंद पडणं आणि यामुळे मृत्यू होण्याचा धोका 41 टक्के असतो, अशी माहिती मॅकमास्टर अँड पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजतर्फे करण्यात आलेल्या संशोधनाद्वारे समोर आली आहे.
काही जण आरोग्याच्या समस्यांच्या कारणांमुळे गरजेपेक्षा जास्त झोपतात, या लोकांमध्ये हृदयसंबंधित रोग होण्याचे धोके अधिक असतात, असा शोध संशोधकांनी लावला आहे. या संशोधनातील माहिती जर्नल ऑफ युरोपियन हार्टमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
संशोधनकर्त्यांनी दिवसा झोप घेणाऱ्या लोकांमध्येही आरोग्यसंबंधित संभाव्य धोक्यांचेही निरीक्षण केले. संशोधक चौंगशी वांग यांनी सांगितले की, जी लोक रात्री 6 तासांहून अधिक झोपतात आणि दिवसाही काही वेळासाठी झोप घेतात. या लोकांमध्ये हृदयसंबंधित आजार आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं आढळून आले. तर दुसरीकडे, जी लोक 6 तासाहून कमी झोपतात तसंच दिवसाही त्यांना झोपण्यासाठी पुरेसे वेळ मिळत नाही, त्यांना या समस्यांचा सामना करावा लागत नाही.