लहान मुले, महिलांच्या पोटाचा घेर आणखी वाढला; भारतात ५ ते १९ वर्षे वयोगटांतील तब्बल १.२५ कोटी मुले स्थूलत्वामुळे त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 07:21 AM2024-03-02T07:21:50+5:302024-03-02T07:22:16+5:30
जगभरात स्थूल असलेली बालके, किशोरवयीन व प्रौढ व्यक्ती यांची एकूण संख्या १ अब्ज आहे. १९९० सालापासून आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्या लोकांची संख्या घटत चालली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे १.२५ कोटी मुले ही स्थूल आहेत. त्यातील ७३ लाख हे मुलगे व ५२ लाख मुली आहेत. ही २०२२ सालातील आकडेवारी आहे. जगातील स्थूल व्यक्तींविषयी विश्लेषण करणारा एक लेख लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
जगभरात स्थूल असलेली बालके, किशोरवयीन व प्रौढ व्यक्ती यांची एकूण संख्या १ अब्ज आहे. १९९० सालापासून आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्या लोकांची संख्या घटत चालली आहे. बहुतांश देशांमध्ये कुपोषणामुळे स्थूलपणाचा आजार होत आहे. गेल्या ३३ वर्षांमध्ये कुपोषणामुळे जागतिक स्तरावर कोणत्या प्रकारचे आजार बळावले याचे चित्र लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून उभे करण्यात आले आहे. या आजारांचे विश्लेषण शास्त्रज्ञांच्या एनसीडी-रिस्क फॅक्टर कोलॅब्रेशन (एनसीडी-रिस्क) या संस्थेने तसेच जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तरीत्या केले आहे. आहार आणि पुरेसा व्यायाम केल्यास स्थूलतेवर मात कता येईल, असे आरोग्यत्ज्ञांनी सांगितले.
महिलांनो, सावध व्हा : भारतामध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये स्थूलत्वाचे प्रमाण १९९० मध्ये १.२ टक्के होते ते २०२२ मध्ये महिलांमध्ये ९.८ टक्के, तर पुरुषांमध्ये ५.४ टक्के इतके वाढले आहे. देशात ४.४ कोटी महिला, २.६ कोटी पुरुष यांना हा आजार झाला आहे. आवश्यकतेपेक्षा कमी वजन असलेल्यांचे प्रमाण जागतिक स्तरावर मुलींमध्ये एक पंचमांश, तसेच मुलांमध्ये एक तृतीयांश इतके घटले.
१ अब्ज जगभरातील स्थूल असलेल्या बालकांची संख्या आहे.
१९९०च्या दशकात प्रौढ व्यक्तींमध्ये अधिक आढळणारा स्थूलत्वाचा आजार आता लहान मुलांमध्येही दिसू लागला आहे.
१९९०पेक्षा २०२२मध्ये जगात स्थूल व्यक्तींचे प्रमाण चारपट वाढले आहे.
ही चिंतेची बाब आहे. जगातील गरीब देशांमध्ये असंख्य लोक कुपोषणग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्थूलत्वाचा आजार वाढत आहे. जागतिक स्तरावर या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांचे प्रमाण दुप्पट व पुरुषांपेक्षा तिप्पट झाले आहे. जगभरात १५.९ कोटी बालके, किशोरवयीन मुले व ८७.९ कोटी प्रौढ व्यक्ती स्थूलत्वाच्या आजाराने ग्रस्त आहेत.
- माजिद इज्जती, प्राध्यापक, इम्पेरियल कॉलेज