घामाच्या वासानं लाज वाटतेय, लोकांमध्ये मिसळण्यास संकोच वाटतो मग या गोष्टी करून पाहाच!
By Admin | Published: June 30, 2017 06:09 PM2017-06-30T18:09:01+5:302017-06-30T18:09:01+5:30
शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो.पण सोप्या उपायांनी तो घालवताही येतो.
- माधुरी पेठकर
घामचा वास येतो यामुळे अनेकांना लाज वाटते.लोकांमध्ये मिसळताना संकोच वाटतो. आणि आपल्यापासून लोकं घामाच्या वासामुळे दूर पळतात या भावनेनं तर अपमानित व्हायला होतं. शरीराची दुर्गंधी हा त्रास अनेकांना असतो. अनेकजण डिओडरन्ट वापरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न करतात. पण त्याचा परिणाम फार कमी वेळ टिकतो. या समस्येवर उपाय कोणत्याही आर्टिफिशिअलपध्दतीनं न करता काही नैसर्गिक घटकांचा वापर करून, आहारात आणि राहाणीमानात बदल करूनही शरीराची दुर्गंधी घालवता येते.
काय खावं प्यावं आणि काय घालावं?
दुर्गंधी शरीरातून येते तेव्हा केवळ बाह्य उपचार करून भागत नाही तर आपण काय खातो पितो याकडे लक्ष देवून त्याबाबतचे नियम पाळणंही गरजेचं आहे. तसेच आपण कपडे बूट कसे घालतो, शरीरस्वच्छतेच्या आपल्या सवयी काय आहेत याकडे लक्ष देवून त्यात बदल करणंही आवश्यक आहे.
1 ) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. विषारी घटक बाहेर पडून गेल्यानंही शरीरास दुर्गंधी येत नाही.
2) आहारात प्रथिनं, कडधान्यं, तंतूमय पदार्थ, आरोग्यदायी फॅटस, ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या आणि फळंभाज्या यांचा समावेश करावा.
3) पचण्यास अवघड पदार्थ कमी खावेत. किंवा खाऊच नये. हे पदार्थ शरीरात टॉक्सिन्स निर्माण करतात.
4) मैदायुक्त पदार्थ, रिफाइन्ड साखर खाऊ नये. प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाऊ नये.
5) अतिमसालेदार ( कांदा, लसूण) जास्त असलेले पदार्थ खाऊ नये.
6) शरीराची दुर्गंधी येणाऱ्यांनी चहा कॉफीचं प्रमाण आटोक्यात ठेवावं. शक्यतो चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावं.
7) पुदिना, कोथिंबीर, पार्सली, ओरिगॅनो या वनस्पतींचा समावेश पदार्थात करावा.
8 ) बडीशेप चावून खावी.
9) रोज आंघोळ करावी. आंघोळीचा साबण उग्र नसावा. साबण जास्त लावू नये. नैसर्गिक तत्वांचा उपयोग केलेला सौम्य साबण आंघोळीसाठी वापरावा.
10) न धुतलेले कपडे वापरू नये.
11) घट्ट बूट घालू नये. जास्त वेळ बूट घालू नये. बुटांऐवजी सॅण्डल्स वापराव्यात.
12) काखेतले केस नियमिपणे काढून टाकावेत.
13) राग आणि ताण नियंत्रणात ठेवावा. या दोन गोष्टींमुळेही जास्त घाम येतो आणि त्यामुळे शरीरास दुर्गंधी येते.
14) गुदमरवणारे घट्ट कपडे न वापरता सैल कपडे वापरावेत.