तुमची मुलं कॉलर, बटणं, नखं कुरतडतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:08 AM2022-10-18T10:08:20+5:302022-10-18T10:08:49+5:30
लहान मुलांचं कधी निरीक्षण केलं आहे? आपण कधी त्यांच्याकडे इतकं बारकाईनं पाहत नाही, त्यांच्या सवयींचं मूल्यमापनही करीत नाही.
लहान मुलांचं कधी निरीक्षण केलं आहे? आपण कधी त्यांच्याकडे इतकं बारकाईनं पाहत नाही, त्यांच्या सवयींचं मूल्यमापनही करीत नाही. बऱ्याचदा त्यात काही वावगं असेल तर ते आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण ते फार गांभीर्यानंही घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आता नीट पाहा. किमान आपल्या घरातल्या मुलांकडे तरी नीट बघा. आजपर्यंत काही गोष्टींचं आपल्याला वावगं वाटलं नसेल; कारण आपल्या मुलांसारखी इतरही अनेक मुलं तुम्हाला दिसली असतील; त्यामुळे आपलं मूल जे काही करतंय, वागतंय, त्यात काही वावगं नाही, असं तुम्हाला वाटलं असेल.
उदाहरणार्थ, तुमचं मूल शर्टची कॉलर चोखतं का? नेहमी नखं कुरतडत असतं का?... तसं करीत असेल आणि काही दिवसांत त्याची ती सवय सुटली नाही, तर काहीतरी गडबड नक्की आहे, असं समजा; कारण अशा मुलांमध्ये काहीतरी मानसिक तणाव असू शकतो, कुठल्या तरी गोष्टींची चिंता त्यांना वाटत असू शकते. त्यामुळेच नखं कुरतडण्यासारखी, कॉलर, शर्ट किंवा फ्रॉक तोंडात घालण्याची कृती ते करीत असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष काढायला काहीच हरकत नाही. त्यानंतर आपल्या मुलांशी बोलून, त्यांना समजून घेऊन त्यांना कसली काळजी वाटते, हे समजून घेतलं पाहिजे. मुलांना त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली पाहिजे. डॉक्टर किंवा कौन्सिलरचा सल्ला घ्यायला हवा. इतकं छोटंसं कारण; पण त्यामुळे आपल्या मुलाच्या वर्तमान आणि भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या संशोधनानं हे सिद्ध केलं आहे. अमेरिकेच्या प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्सच्या ॲडव्हायजरी ग्रुपने या संदर्भात व्यापक प्रमाणावर संशोधन केलं. पेडिॲट्रिक बिहेव्हिअर हेल्थ इंटिग्रेशन प्रोग्रामचे संचालक हसू वाल्केट यांचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटत असेल, आपलं ३-४ वर्षांचं मूल कॉलर चोखतं आहे, शर्टचं बटण सारखं तोंडात घालत आहे, म्हणजे ते नॉर्मलच आहे, कारण त्या वयाची सगळीच मुलं असं करतात; पण तसं नाही. तीन वर्षांचं हे मूल आधी कॉलर चोखतं, नऊ वर्षांचं होईपर्यंत ते आपली नखं दातांनी कुरतडायला लागतं. किशोरावस्थेत शाळेत जात असताना त्याचा मानसिक संघर्ष आणखी वाढलेला असतो.
शाळा, शाळेचा अभ्यास, मित्र-मैत्रिणी जोडणं, त्यांच्याशी जुळवून घेणं.. इत्यादी गोष्टींमध्ये त्याला अडचणी यायला लागतात, इतरांपेक्षा तो वेगळा, अलग पडायला लागतो. शाळेत काय घडतं हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही, मूलही आपल्याला त्याबाबत काही सांगत नाही; पण बऱ्याच गोष्टींशी आपल्याला जुळवून घेता येत नाही, हे त्याच्या लक्षात आल्यावर तो त्यापासून दूर राहायला लागतो, सर्वांमध्ये न मिसळता, ठरावीक मित्र-मैत्रिणींमध्येच तो राहायला लागतो. कालांतरानं त्या ग्रुपमध्येही त्याला जुळवणं अवघड झाल्यावर घरकोंबडेपणाकडे त्याची वाटचाल सुरू होते. शाळेत आणि घरी, कोणीही त्याला समजून न घेतल्यामुळे, त्याची अडचण वेळीच लक्षात न आल्यामुळे मानसिक ताणतणावांचा तो शिकार होतो.
अमेरिकेत टास्क फोर्सला तर आढळून आलंय, तेथील १८ वर्षांपर्यंतच्या ७,२८ कोटी मुलांपैकी जवळपास एक कोटी मुलं डिप्रेशनची शिकार झालेले आहेत. यांतील काहींवर उपचार सुरू आहेत. काहींवरील उपचार पूर्ण झाले असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत, तर अजूनही लाखो मुलं डॉक्टरांपर्यंतच पोहोचलेली नाहीत आणि त्यांच्यावर उपचारही सुरू झालेले नाहीत. सध्या अमेरिकेत मुलं केवळ नैराश्याचीच शिकार झालेली नाहीत, अनेक कच्चीबच्ची मुलं आत्महत्येकडेही वळत आहेत. अमेरिकेत मुलांच्या आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. योग्य वयात आणि योग्य वेळी मुलांना समजून घेणं, त्यांच्यावर उपचार न होणं, यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
त्यामुळे अमेरिकेतील आठ ते अठरा वयोगटातील सर्व मुलांची मानसिकता, त्यांच्यातलं नैराश्य यांची तपासणी केली जावी अशी शिफारस टास्क फोर्सनं केली आहे. अमेरिका आणि तेथील मुलं हा अपवाद नाही. जगात इतरही अनेक देशांत लहान मुलं नैराश्याची शिकार झालेली आहेत आणि त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मुली, तरुणींमध्ये आत्महत्येचा धोका
अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या ताज्या अहवालानुसार १५ ते २४ वयोगटातील तरुण मुलामुलींमध्ये आत्महत्येचा धोका सर्वाधिक असतो. त्यातही तरुणींना हा धोका अधिक आहे. २०२० ते २०२१ या काळात झालेल्या एका व्यापक सर्वेक्षणात दहा ते चौदा वयोगटातील तब्बल १६ टक्के मुलींनी आत्महत्या केल्याचं आढळून आलं.