विशेष लेख : रात्रभर जागाल, तर मातृत्वाला मुकाल!
By संतोष आंधळे | Published: May 28, 2023 07:46 AM2023-05-28T07:46:12+5:302023-05-28T07:46:28+5:30
चांगल्या आरोग्यासाठी निसर्ग नियमानुसार दिवसा काम आणि रात्री झोपणे आवश्यक आहे. मात्र नाईट शिफ्टमध्ये काहीजण काम करतात....
चांगल्या आरोग्यासाठी निसर्ग नियमानुसार दिवसा काम आणि रात्री झोपणे आवश्यक आहे. मात्र नाईट शिफ्टमध्ये काहीजण काम करतात. विशेषत: आयटी क्षेत्रात पुरुषांसोबतच महिलाही नाईट शिफ्टमध्ये काम करतात. नव्या संशोधनानुसार महिलांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष 25 व्या युरोपियन एंडोक्रायोनोलोजी काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधप्रबंधात मांडण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. चांगल्या आरोग्यासाठी निसर्ग नियमानुसार दिवसा काम आणि रात्री झोपणे आवश्यक आहे. मात्र नाईट शिफ्टमध्ये काहीजण काम करतात. विशेषत: आयटी क्षेत्रात पुरुषांसोबतच महिलाही नाईट शिफ्टमध्ये काम करतात. कॉल सेंटर हा त्याच्याच कामाचा एक भाग. नव्या संशोधनानुसार कामाच्या अनियमित वेळांचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष २५ व्या युरोपियन एंडोक्रायोनोलोजी काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या शोधप्रबंधात मांडण्यात आला आहे. त्यामुळे महिलांना आई होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
तुर्की येथील इस्तंबूल शहरात ह्यालिक काँग्रेस सेंटर येथे १३ ते १६ मे या कालावधीत वैद्यकीय विश्वातील हार्मोन्स तज्ज्ञांची परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महिलांच्या प्रजनन क्षमतेवर कामाच्या अनियमित वेळेचा कसा परिणाम होतो, यावर शोधनिबंध सादर करून चर्चा करण्यात आली. मानवी शरीर हे सामान्यपणे २४ तासांच्या दिनक्रमानुसार कार्य करत असते. प्रकाशातील चढ-उतारावरून मानवी शरीराचे काम सुरू असते. त्यावरून झोपण्याची, उठण्याची वेळ, हार्मोन्सचे स्रवण, पचनक्रिया आदी प्रक्रिया सुरू असतात. मात्र स्पर्धात्मक युगात मानवी जैविक घड्याळाच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून कंपनी देईल त्या वेळेला काम करण्यास तरुणाईचा होकार असतो.
स्त्रीबीजावर परिणाम
अनियमित कामाच्या वेळांमुळे महिलांच्या स्त्रीबीजांवर परिणाम होत असतो. प्रजनन प्रक्रियेत स्त्रीबीजाची मुख्य भूमिका असते. चांगल्या स्त्रीबीजासाठी ल्युटेनिझिंग हार्मोन्सची गरज असते. ल्युटेनिझिंग हार्मोन हा एक संप्रेरक आहे, जो पिट्युटरी ग्रंथीद्वारे तयार केला जातो.
शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये मानवी जैविक घड्याळ बदलले आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम ल्युटेनिझिंग हार्मोनवर होतो. या हार्मोनची पातळी अधिक वाढणे आणि फार कमी होणे याचा परिणाम स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर होत असतो. स्त्रीबीज चांगले नसेल, तर त्याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो आणि गर्भधारणा राहण्यास अडथळे निर्माण होतात.
यासोबत स्त्रीबीजासाठी आणखी एक महत्त्वाचे असणारे मेलॅटोनिन हार्मोन्सचे स्त्रवण अंधारात चांगले होते. जर रात्रीच्यावेळी प्रकाश असेल, तर त्याचे स्रवण होत नाही. त्याचा परिणामसुद्धा स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे मेलॅटोनिन हार्मोन्सच्या गोळ्यासुद्धा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे रात्री लाईट लावून झोपणाऱ्या महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असतो.
नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. स्त्रीबीज निर्मितीसाठी महिलांच्या मेंदूच्या मध्यवर्ती भागात असणारी पिनियल ग्रंथी उत्तेजित होणे गरजेचे असते. त्यासाठी महिलांना सूर्यप्रकाश मिळणे गरजेचा असतो. मात्र नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या महिलांना सूर्यप्रकाश मिळत नाही. गुणवत्तापूर्ण स्त्रीबीज तयार होत नाही. त्यामुळे गर्भधारणेत अडथळे निर्माण होतात. मानवी जैविक घड्याळाच्या विरोधात जाऊन काम केल्यास ल्युटेनिझिंग हार्मोन्सवर सुद्धा परिणाम होतो.
डॉ. अमित पत्की,
आय.व्ही.एफ. तज्ज्ञ, नियोजित अध्यक्ष,
इंडियन सोसायटी फॉर अस्सिस्टेड रिप्रॉडक्शन
वंध्यत्व स्त्री-पुरुष दोघांमध्ये समान
विशेष म्हणजे वंध्यत्व हे फक्त स्त्रियांमध्ये असते असे नाही. त्याचे प्रमाण स्त्री-पुरुष दोघांमध्ये समान असल्याचे आढळून येते. पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये दोष आढळून येतात, तर महिलांच्या स्त्रीबीजामध्ये दोष दिसतात. वैद्यकीय विश्वात या दोन्ही समस्यांवर आता उपचार उपलब्ध आहेत.