जंक फूड म्हणजे आजारांना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:21 AM2022-09-26T06:21:21+5:302022-09-26T06:21:40+5:30

आजकाल जंक फूड खाणे म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ होत चालले आहे. विशेषत: शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये फास्ट फूडची विशेष क्रेझ आहे.

special article on Junk food is an invitation to diseases injurious to health | जंक फूड म्हणजे आजारांना आमंत्रण

जंक फूड म्हणजे आजारांना आमंत्रण

googlenewsNext

डॉ. अमित मायदेव 
पोटविकार तज्ज्ञ

आजकाल जंक फूड खाणे म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ होत चालले आहे. विशेषत: शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये फास्ट फूडची विशेष क्रेझ आहे. बर्गर, पिझ्झा, पास्ता, फ्रेंच फ्राइज, केक, हॉट डॉग, डोनट्स आणि चायनीज हे शब्द सगळ्यांच्याच घरी एखादी पार्टी असेल तर ठरलेले असतात. त्यात पालकांकडून आणि मित्रमंडळींतून या सगळ्या पदार्थांचे स्वागतच होत असते. मात्र, हे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, हा विचारही आपल्या डोक्यात कधी येत नाही. कारण जंक फूड खाताना जिभेचे चोचले पुरविले जातात. कालांतराने या जंक फूडचे दुष्परिणाम शरीरावर दिसण्यास सुरुवात होते.

जंक फूडमध्ये शरीराला पोषक अशा गोष्टी कमी आणि घातक ठरू शकणाऱ्या पदार्थांचे प्रमाण अधिक असते. फॅट्स, मीठ, साखर आणि विविध प्रकारची रसायने जंक फूडमध्ये असतात. तसेच पदार्थ अधिक लज्जतदार बनविण्यासाठी त्यात सर्रासपणे रंगांचा वापर केला जातो. या सर्व गोष्टी मानवी शरीरासाठी चांगल्या नसतात. या सर्व गोष्टींचा परिणाम थेट पचनसंस्थेवर होत असतो. जंक वा फास्ट फूडमुळे वजन वाढते. सतत जंक फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. एकदा का स्थूलपणा आला की सर्व व्याधी शरीराला जडू लागतात. त्यात मधुमेह, रक्तदाब, धाप लागणे, सांधेदुखी, हृदयविकार, इत्यादींचा समावेश असतो. लठ्ठपणामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. एरव्ही साधे अन्न पचविण्यासाठी आवश्यक जिवाणू पोटात असतात; परंतु जंक फूडमुळे वाईट जिवाणूंचे प्रमाण वाढते आणि पंचनसंस्थेत बिघाड निर्माण होऊन पोटाचे विकार बळावतात. 

  • तेव्हा जंक फूड खाताना संयम हेच मुख्य पथ्य आहे. कुठे थांबायचे हे समजले तर जंक फूडमुळे होणारे पोटाचे विकार जवळपासही भटकणार नाहीत. ताजी फळे खाणे केव्हाही उत्तम. त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. 
  • प्रदूषणाची पातळी आपल्याकडे अधिक आहे. त्यात जंक फूडमुळे विविध आजारांना आपण स्वत:हून निमंत्रण देत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याकडे चौरस आहाराला असलेले महत्त्व ठळकपणे अधोरेखित होते. चौरस आहारातून सर्व प्रकारची जीवनसत्त्वे प्राप्त होतात. 
  • पूर्वीच्या काळी शारीरिक कष्टाची कामे मोठ्या प्रमाणात केली जायची. मात्र, आता त्या स्वरूपाची कामे नसली तरी आपण व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. व्यायाम शरीराला झेपेल इतकाच आणि प्रशिक्षकाच्या निरीक्षणाखाली करावा. 
  • आपल्याला पीळदार शरीरापेक्षा शरीर निरोगी ठेवायचे आहे, हे कायम लक्षात ठेवावे. जंक फूड एक-दोनदा वा कधी तरी खाल्ले तर ठीक आहे. मात्र, त्याचे सेवन नियमितपणे केल्यास शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते, हे नक्की.

Web Title: special article on Junk food is an invitation to diseases injurious to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न