सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत
By मुकेश चव्हाण | Published: January 6, 2021 07:33 AM2021-01-06T07:33:04+5:302021-01-06T07:40:00+5:30
तुम्ही हा काढा घरी देखील बनवू शकता. ज्याने तुम्हाला कोरोनाच्या संकटात रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास उपयोगी ठरेल.
आता हिवाळा सुरु झाला आहे आणि या ऋतूत सर्वाधिक होणारा आजार म्हणजे ताप, सर्दी आणि खोकला. थोडी जर थंडी शरीराला लागली तरी त्यांना सर्दी खोकला होतो. हा आजार जरी सामान्य असला तरी जर हाताबाहेर गेला तर खूप हैराण करतो. कधी कधी आपल्याला सुद्धा सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतो.
सर्दी खोकला झाला की डॉक्टरांकडे जावे आणि गोळ्या घेणे हीच आपली सवय, मात्र अशा गोळ्या जास्त खाणे सुद्धा घातक ठरू शकते. खास करून लहान मुलांना जास्त औषधे न देण्याचा सल्ला जाणकार सुद्धा देतात. यावर पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला एका खास काढ्याबद्दल सांगणार आहोत, जो सर्व वयातील लोक सर्दी, खोकला, ताप आणि घसा खवखवल्यावर हा काढा पिऊ शकतात.
कोरोनाचे संकट आल्यापासून आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आणि आणि त्यातल्या त्यात विषाणूपासून संरक्षण देणाऱ्या काढ्यांचे सेवन सुद्धा वाढले आहे. मात्र तुम्ही हा काढा घरी देखील बनवू शकता. ज्याने तुम्हाला कोरोनाच्या संकटात रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास उपयोगी ठरेल.
दालचीनी अन् लवंगचा काढा-
पहिल्यांदा एका भांड्यात एक ग्लास पाणी टाका. त्यानंतर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये दालचीनीचा एक तुकडा, दोन- तीन लवंग आणि एक वेलची टाका. आता एक चमचा अजवायन, एक चमचा खिसलेले अद्रक, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा हळद आणि खिसलेली काळी मिरी टाका. यासोबतच ५- ६ तुळशीची पानंही टाका. यानंतर ते पाण्यासह थोडा वेळ उकळू द्या. अशा प्रकारे तुम्ही घरात दालचीनी अन् लवंगचा उपयोग करुन काढा तयार करु शकता. हा काढा दिवसातून दोनवेळा प्यायलाने ताप लवकरात लवकर बरा होऊ शकतो.
अद्रक आणि गुळचा काढा-
उकळत्या पाण्यात खिसलेली लवंग, काळी मिरी, वेलची, अद्रक आणि गुळ टाका. हे टाकल्यानंतर पाणी चांगलं उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर थोडी तुळशीची पानं त्यामध्ये टाका. त्यानंतर पाणी उकळून थोडं कमी झाल्यानंतर ते गाळून काढा एका कपात किंवा भांड्यात काढून ते पिऊ शकता.
काळी मिरी आणि लिंबूचा काढा-
एक चमचा काळी मिरी आणि चार चमचे लिंबूचा रस एक कप असलेल्या पाण्यात टाका. त्यांनंतर पाणी गरम करा. तसेच पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही मध देखील टाकू शकता. या काढ्याच्या सहाय्याने सर्दी- खोकला यांच्यापासून मुक्ती मिळू शकते. त्याचप्रमाणे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते.