प्रयोगशाळेत स्पर्म तयार करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी, बाळ न होणाऱ्या जोडप्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 04:14 PM2022-04-12T16:14:45+5:302022-04-12T16:46:17+5:30

जगभरात सातपैकी एका दाम्पत्याला मूल होण्यासंबंधीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी निम्म्या म्हणजेच ५० प्रकरणांमध्ये पुरुषांमध्ये दोष असल्याचं दिसून आलं आहे; मात्र या अनुषंगाने शास्त्रज्ञांनी एक महत्वपूर्ण संशोधन केलं आहे.

sperm count increasing technique found by scientist | प्रयोगशाळेत स्पर्म तयार करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी, बाळ न होणाऱ्या जोडप्यांना दिलासा

प्रयोगशाळेत स्पर्म तयार करण्यात शास्त्रज्ञ यशस्वी, बाळ न होणाऱ्या जोडप्यांना दिलासा

Next

गेल्या काही वर्षांत वाढते ताण-तणाव आणि बदलत्या जीवनशैलीचा (Lifestyle) आरोग्यावर (Health) प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. अनेकांना कमी वयात गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. या गोष्टींचा परिणाम प्रजनन क्षमतेवर झाल्याचं दिसून येत आहे. जगभरात सातपैकी एका दाम्पत्याला मूल होण्यासंबंधीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी निम्म्या म्हणजेच ५० प्रकरणांमध्ये पुरुषांमध्ये दोष असल्याचं दिसून आलं आहे; मात्र या अनुषंगाने शास्त्रज्ञांनी एक महत्वपूर्ण संशोधन केलं आहे.

या संशोधनादरम्यान उंदरांवर ट्रायल (Trial on Rat) घेण्यात आल्या असून, त्या यशस्वी ठरल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हे संशोधन पूर्णतः यशस्वी ठरल्यास भविष्यात पुरुषांमधल्या वंध्यत्वावर (Infertility) उपाय सापडेल आणि जोडप्यांना मूल होण्यात येत असलेल्या दूर होतील, अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने उपचार करणं शक्य झालं आहे. जगभरात अनेक जोडप्यांना मूल होण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अर्थात यामागे अनेक कारणं आहेत. यात पुरुषांमधल्या वंध्यत्वाच्या समस्येचाही समावेश होतो.

या समस्येचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी जपानी शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन केलं आहे. या शास्त्रज्ञांना प्रयोगशाळेत शुक्राणू पेशी (Sperm Cells) विकसित करण्यात यश आलं आहे. या शुक्राणू पेशींचा प्रयोग उंदरावर केला गेला आणि त्यात यश मिळाल्याचा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे. जे पुरुष पिता बनू शकत नाहीत, त्यांना भविष्यात प्रयोगशाळेत तयार केलेल्या शुक्राणूंपासून नक्कीच दिलासा मिळेल, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

`एक ना एक दिवस मानवी शुक्राणूदेखील तयार करता येतील हे या प्रयोगातून स्पष्ट होतं. तसं झाल्यास सर्वप्रथम मानवी त्वचेच्या पेशींचं (Skin Cells) रूपांतर स्टेम सेल्समध्ये (Stem Cells) करणं शक्य होईल,` असं लंडनमधल्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक रॉबिन लॉवेल बॅज यांनी सांगितलं.

प्रयोगशाळेत शुक्राणू पेशी कशा तयार केल्या, हे आता जाणून घेऊ या. जपानमधल्या टोकियो युनिव्हर्सिटीच्या (Tokyo University) शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या हा प्रयोग उंदरावर केला गेला आहे. शुक्राणू पेशी तयार करण्यासाठी उंदरांच्या शरीरातून पेशी घेण्यात आल्या. अनेक रसायनांच्या मिश्रणाच्या मदतीनं त्यांचं शुक्राणू पेशींमध्ये रूपांतर करून त्या नर उंदरांच्या अंडकोषात सोडण्यात आल्या. या नव्या शुक्राणू पेशी नर उंदरांच्या अंडकोषात पोहोचल्यानंतर काही काळाने मॅच्युअर झाल्या.

त्यानंतर त्या मादी उंदरांच्या बीजांडात इंजेक्ट करण्यात आल्या. या उंदरांनी पिल्लांना जन्म दिल्यानं हा प्रयोग यशस्वी झाला. ही एक प्रकारे आयव्हीएफ प्रक्रिया होती. या प्रक्रियेत नर उंदरांचे शुक्राणू मादी उंदरांच्या अंड्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. हा प्रयोग मानवासाठी आशेचा एक किरण ठरू शकतो. जगभरात मूल होण्यासाठी अडचणींचा सामना करणाऱ्या जोडप्यांसाठी भविष्यकाळात ही प्रक्रिया उपयुक्त ठरू शकते.

 

Web Title: sperm count increasing technique found by scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.