पावसाळ्याची सुरुवात सर्दीने होऊ नये असं वाटत असेल तर घ्या ही काळजी....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 02:42 PM2019-06-14T14:42:52+5:302019-06-14T14:48:15+5:30
उन्हाळा जाऊन आता पावसाळ्याचे वेध लागलेले असताना सर्वत्र सर्दीची साथ आली आहे. अचानक कडक ऊन आणि मध्येच पावसाची सर असा निसर्गाचा बदल सुरु असताना अनेकांना घसा सुजणे, शिंका येणं असे सर्दीचे संकेत सुरु होतात. पण हे सगळं टाळायचं असेल तर आम्ही दिलेले हे उपाय नक्की करा.
पुणे :उन्हाळा जाऊन आता पावसाळ्याचे वेध लागलेले असताना सर्वत्र सर्दीची साथ आली आहे. अचानक कडक ऊन आणि मध्येच पावसाची सर असा निसर्गाचा बदल सुरु असताना अनेकांना घसा सुजणे, शिंका येणं असे सर्दीचे संकेत सुरु होतात. पण हे सगळं टाळायचं असेल तर आम्ही दिलेले हे उपाय नक्की करा.
आल्याचा चहा : अँटिऑक्सिडंट असलेलं आलं पावसाळ्यात मस्ट आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या चहात आल्याचा तुकडा टाकायला विसरू नका.
भिजल्यावर पहिल्यांदा डोकं कोरडं करा : लांब केस असतील तर भिजल्यावर पहिल्यांदा डोकं कोरडं करा. कारण जास्त वेळ डोकं ओलं असेल तर सर्दी लगेच होऊ शकते. शिवाय ओल्या डोक्याला वारा लागल्यास डोकेदुखीची होते.
तेलकट नाही, पौष्टिक खा :पावसाळ्यात अनेकदा भजी, वडापावसारखे पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण हे पदार्थ चांगल्या प्रतीच्या तेलात केले असतीलच याची खात्री नसते. यामुळे घास तर खराब होऊ शकतोच पण आजारपणही येऊ शकतं.
गरम पाणी पिण्याची सवय लावा : उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची लागलेली सवय पावसाळ्यात पहिल्यांदा बंद करा. त्याऐवजी दररोज कोमट आणि रात्री झोपताना एक ग्लास गरम पाणी प्या.
सर्दी झालेल्यांपासून लांब रहा :सर्दी हा संसर्गजन्य आजार आहे. विशेषतः ज्याची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा लहान मुले यांना संसर्गाने लवकर सर्दी होते. त्यामुळे सर्दी झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात जाणं टाळा. त्यांचे हातरुमाल वापरू नका.
ए. सी.चा वापर टाळा : एसीच्या वापरामुळेही अनेकदा सर्दी होते. विशेषतः बाहेरून भिजून आल्यावर थेट ए. सी. लावलेल्या खोलीत गेलात तर तिथे थंडी वाजून सर्दी होण्याचा संभव असतो. पावसाळ्यात उन्हाळ्याइतकी उष्णताही हवेत नसते. त्यामुळे एसीच्या ऐवजी कमी गतीने पंखा वापरा.