धुम्रपानापासून राहा दूर आणि मिळवा अधिक सोयी, सवलती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:40 PM2017-11-01T13:40:31+5:302017-11-01T13:44:05+5:30
पाश्चात्य देशांत धुम्रपानविरोधासाठी आता नवीन क्लृप्ती..
- मयूर पठाडे
धुम्रपानाचे काय तोटे आहेत हे आता कोणालाच सांगायला नको. धुम्रपानामुळे अनेक तरुणांचं आयुष्य बरबाद झालं आहे. धुम्रपान हे एकेकाळी फॅशन होती. चित्रपट आणि जाहिरातींत मर्दानी पुरुष म्हणून त्यांचं उदात्तीकरणही केलं जायचं. अलीकडच्या काळात सगळ्यांनाच त्यातला धोका कळल्यानं अनेक देशांत धुम्रपानविरोधांत मोठ्या चळवळी सुरू झाल्या. सरकारी पातळीवरही त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. सिगारेटच्या पाकिटांवर वैधानिक इशारा छापणं आणि चित्रपटांतील दृष्यांतही त्याबाबतचा इशार देणं बंधनकारक करण्यात आलं. तरीही त्याचा म्हणावा तितका परिणाम झाला नाही.
धुम्रपान सोडणं हे अवघड आहे, पण अशक्य नाही, याचं भान सगळ्यांनाच असलं तरी त्याप्रमाणे कृती होत नाही हेदेखील तितकंच खरं आहे. धुम्रपान करणाऱ्यासाठी अलीकडे स्वतंत्र धुम्रपान कक्ष केला जात असला तरी पॅसिव्ह स्मोकिंगमुळे धुम्रपान न करणाऱ्याचं आरोग्यही मोठ्या प्रमाणात धोक्यात येत आहे.
धुम्रपानाच्या विरोधात कायदे कडक करण्यात आले, धुम्रपानाच्या साधनांची किंमत वाढवण्यात आली, त्याविरुद्ध जनजागृती करण्यात आली, तरीही धुम्रपान करणाऱ्याची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही हे अनेक देशांचं मोठं दुखणं आहे.
त्यामुळे आता अनेक ठिकाणी उलटा विचार सुरू झाला आहे. धुम्रपान करणाऱ्यासाठी कायदे कडक करण्याबरोबरच जे धुम्रपान करीत नाहीत, त्यांना अधिक सोयी आणि सवलती देण्याचा विचार आता सगळीकडेच बळावतो आहे. जपानमध्येही धुम्रपान करणाऱ्याची संख्या खूपच मोठी आहे. पण अशा लोकांमुळे सगळ्यांच्याच आरोग्यावर विपरित परिणाम होतो हे तर खरंच, पण त्यामुळे कार्यक्षमताही कमी होते. जपानमधील मियाला या मार्केट फर्मनं यासंदर्भात आपल्या कर्मचाऱ्यासाठी एक नवी प्रोत्साहनपर योजना सुरू केली आहे. जे कर्मचारी धुम्रपान करीत नाहीत, त्यांना वर्षाला सहा अतिरिक्त सुट्या आता देण्यात येणार आहेत. कारण धुम्रपान करणारे धुम्रपानासाठी एकदा बाहेर पडले तरी त्यासाठी त्यात पंधरा मिनिटे वाया जातात. कामाच्या वेळेत पाच वेळेस ते धुम्रपानासाठी गेले तरी तासाभरापेक्षा जास्त काळ वाया जातो. हे लक्षात आल्यानं कंपनीनं धुम्रपान न करणाऱ्याना सुट्यांची सवलत देऊ केली. याचा लगेचंच चांगला परिणाम दिसून आला. धुम्रपान करणाऱ्या काही कर्मचाऱ्यानीही लगोलग आम्हीही धुम्रपान सोडणार असल्याचं जाहीर केलं. अशा प्रयत्नांना आता जगभरात चालना मिळते आहे. आपल्याकडेही अशा योजना यायला आता वेळ लागणार नाही. किमान खासगी क्षेत्रात तरी अशा योजनांमुळे धुम्रपानापासून दूर राहणाऱ्याची संख्या कमी होऊ शकते.