तोंडाचा अल्सर माहीत असेलच, आता पोटाच्या अल्सरची लक्षणे, कारणे अन् बचावाचे उपाय वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 02:59 PM2024-03-23T14:59:00+5:302024-03-23T14:59:22+5:30
Stomach Ulcer: तोंडात फोडं येण्याला अल्सर म्हणतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण अनेकांना ही माहीत नसतं की, तोंडाप्रमाणे पोटातही अल्सर होतो.
Stomach Ulcer: असे अनेक आजार असतात ज्यांबाबत लोकांना फार कमी माहिती असते. अलिकडे या आजारांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोक आजारांबाबत जागरूक होत आहेत. अशीच एक गंभीर समस्या म्हणजे अल्सर. तोंडात फोडं येण्याला अल्सर म्हणतात हे तुम्हाला माहीत असेलच. पण अनेकांना ही माहीत नसतं की, तोंडाप्रमाणे पोटातही अल्सर होतो. जो फार घातक ठरू शकतो.
पोटात अल्सरची कारणे
पोटातील अल्सर छोट्या आतड्यांच्या सुरूवातीच्या भागात किंवा म्यूकलवर होतो. याची काही मुख्य कारणं पोटात अॅसिडचं प्रमाण वाढणं, चहा, कॉफी, सिगारेट आणि मद्यसेवन हे आहेत. त्यासोबतच जास्त आंबट खाणे, मसालेदार खाणे आणि गरम पदार्थ खाणे यानेही पोटात अल्सर होतात.
स्ट्रेसमुळे हार्मोनल इनबॅलन्स होतात. यामुळेही पोटात अॅसिड तयार होतं. जर तुम्ही नेहमीच जास्त स्ट्रेसमध्ये राहत असाल तर पोटात अल्सर होण्याचं हे कारण ठरू शकतं.
पोटाच्या अल्सरची लक्षणे?
1) पोटाच्या वरच्या भागात वेदना - अल्सरची समस्या झाल्यावर पोटाच्या वरच्या बाहेरील भागात वेदना होऊ लागतात. अल्सरमध्ये जेवण केल्यावर पोटात वेदना होतात. तसेच पोट रिकामं असेल तरी वेदना होतात. या स्थितीत अन्न नलिकेच्या खालच्या भागात फोडं येतात. कधी-कधी अन्न नलिकेला छिद्रही पडतं.
2) अॅसिड तयार होणं - आपण जेव्हा काही खातो तेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. याने अन्न पचन होत असतं. कधी कधी पोट खराब झाल्यावर हे अॅसिड वर अन्न नलिकेत जातं आणि जळजळ वाटू लागते. याचा प्रभाव घशात, दातांवर, श्वासांवर पडू लागतो. यानेच तोंडातही फोडं येतात.
3) वजन कमी होणे - पोटाच्या अल्सरने ग्रस्त लोकांचं वजन फार वेगाने कमी होऊ लागतं. याचं कारण म्हणजे अल्सर झाल्यार व्यक्ती खाण्याबाबत उदासीन होतो. त्यामुळे वजन कमी होऊ लागतं. त्यासोबतच अन्न पचनही होत नसल्याने वजन कमी होऊ लागतं.
4) अॅसिडिटीची समस्या - अल्सरमुळे छातीत दुखण्याची समस्याही होते. या वेदना अॅसिडिटी रिफ्लेक्शनमुळे होतात. हृदयात होणाऱ्या वेदना या छातीच्या वरच्या भागात होतात आणि कधी कधी अॅसिडिटीमुळे त्याच जागी वेदना होतात. त्यामुळे यात फरक करणे कठीण होऊन बसतं.
5) रक्ताची उलटी - अल्सरमध्ये असं आढळतं की, उलटी होते किंवा उलटीसारखं वाटतं. जेव्हा अल्सर वाढतो तेव्हा त्रास आणखी वाढतो. कधी कधी उलटीतून रक्तही येऊ शकतं. अशात विष्ठेचा रंगही काळा होतो.
कसा कराल बचाव
- सगळ्यात आधी तर जंक फूड, तळलेले पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
- पेनकिलर, एस्पिरिन, आइब्रूप्रोफेनसारख्या औषधांमुळेही समस्या होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधं खाऊ नका.
- आहारात मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळ्या फळांचा समावेश करा.
- स्ट्रेस दूर करण्यासाठी योगा, मेडिटेशन आणि एक्सरसाइजची मदत घ्या. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा.
- जर तुम्हाला पोटाच्या अल्सरपासून वाचायचं असेल तर धुम्रपान पूर्णपणे बंद करा.