भारतात डॉक्टरांना ओळखता येत नाही टीबीची लक्षणे, रोज १,४०० लोकांचा मृत्यू - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 11:16 AM2018-09-27T11:16:20+5:302018-09-27T11:17:06+5:30
भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे टीबी या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.
भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे टीबी या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. या अभ्यासात त्या लोकांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं जे या आजाराची लक्षणे दाखवण्याचा अभिनय करु शकतील. टीबी हा हवेतून पसरणारा आजार असून भारत, चीन आणि इंडोनेशियासहीत इतरही काही देशांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.
WHO नुसार, २०१७ मध्ये या आजाराने १७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या आजाराला मुळातून नष्ट करण्यासाठी बुधवारी संयुक्त राष्ट्रमध्ये एक वैश्विक आरोग्य संमेलन आयोजित केलं होतं. पण हा गंभीर आजार दूर कऱण्यात प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर कमी पडत आहेत. जे रुग्णांना सुरुवातीला त्यांना खोकला यायला सुरुवात होते तेव्हा तपासतात.
या अभ्यासात असेल सांगण्यात आले आहे की, मुंबई आणि पूर्व पटणामध्ये ही स्थिती निश्चित आहे. हा अभ्यास २०१४ ते २०१५ दरम्यान साधारण १० महिन्यांपर्यंत मॅकगिल यूनिव्हर्सिटी, विश्व बॅंक आणि जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांच्या टीमने केला. रुग्ण म्हणून सादर करण्यात आलेले २४ लोक १,२८८ खाजगी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी साधारण कफ असल्याचे सांगितले आणि त्यावर उपचार केले.
WHO च्या ग्लोबल ट्यूबरक्लोसिस रिपोर्ट २०१८ नुसार, जगभरात गेल्या वर्षभरात एक कोटी लोक टीबीने ग्रस्त झाले आहेत. त्यातील २७ टक्के लोक हे भारतात आहेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये जगभरातील १ कोटी लोकांना टीबी झाला. त्यात ५८ लाख पुरुष, ३२ लाख महिला आणि दहा लाख लहान मुले आहेत.
टीबी जगभरात रोज किती लोक मरतात?
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, टीबीमुळे रोज जगभरात साधारण ४ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. यात हेही सांगण्यात आलं आहे की, जगात आजाराने मृत्यूमुखी पडण्याचं १० वं सर्वात मोठं कारण टीबी आहे.
टीबीचे लक्षणे
टीबीचा उल्लेख झाला की, कमजोरी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे लोकांच्या डोक्यात येतात. असे समजले जाते की, रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं आहे. पण टीबी केवळ फुफ्फुसाचा आजार नाहीये. तर टीबीचं इन्फेक्शन शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतं. त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे पाहता येतील.
१) श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे
२) खोकला आला की उलटी होणे
३) तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त सतत खोकला असणे
४) ताप येणे
५) शरीरात कमजोरी, वजन कमी होणे, थकवा येणे
६) कफ होणे
७) थंडी वाजून ताप येणे
८) रात्री घाम येणे
टीबी होण्याची प्रमुख कारणे
डॉक्टरांनुसार, या आजाराचं मुख्य कारण अशुद्ध पाणी आणि व्यायाम न करणे हे आहे. चांगला आहार आणि नियमीतपणे व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. तसेच तुमच्या शरीराची बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमताही वाढते. त्यासोबतच टीबी होण्याची कारणे खालीलप्रमाणे पाहता येतील.
१) धुम्रपान
२) अल्कोहोल
३) चांगला आहार न घेणे
४) व्यायाम न करणे
५) स्वच्छतेचा अभाव
६) टीबीने ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे