लहान वयात दमा होण्याचं 'हे' आहे कारण, जाणून घ्या लक्षणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:49 AM2018-11-28T10:49:12+5:302018-11-28T10:51:26+5:30
दमा हा श्वसनांसंबंधी आजार पूर्वी मोठ्यांनाच होणारा आजार मानला जात होता. पण हा आजार आता लहान मुलांमध्येही वाढताना दिसत आहे.
दमा हा श्वसनांसंबंधी आजार पूर्वी मोठ्यांनाच होणारा आजार मानला जात होता. पण हा आजार आता लहान मुलांमध्येही वाढताना दिसत आहे. त्यामुळे कमी वयातच लहान मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय. हा आजार होण्याचं एक मुख्य कारण आनुवांशिक मानलं जातं. मात्र या आजाराची वेगवेगळी कारणे आहेत. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, योग्य वजन असेल तर लहान मुलांचा दम्यासारख्या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.
अमेरिकेतील ड्यूक विश्वविद्यालयात अमेरिकेतील ५ लाखांपेक्षा अधिक मुला-मुलींच्या आरोग्यासंबंधी आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. यातून आढळलं की, साधारण एक चतुर्थांश(२३ ते २७ टक्के) लहान मुलांमध्ये दमा होण्याचं मुख्य कारण वाढलेलं वजन हे आहे. म्हणजे ज्यांचं वजन वाढलेलं असतं त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो, असं यातून दिसून येतं.
पीडिअॅट्रिक्स मॅगझिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, २ ते १७ वयादरम्यान कमीत कमी १० टक्के मुला-मुलींच वजन जर निंयत्रित असेल तर त्यांचं या आजाराच्या जाळ्यात येणं टाळलं जाऊ शकतं. ड्यूक विश्वविद्यालयाचे सहायक प्राध्यापक जेसन इ लांग म्हणाले की, 'दमा हा लहान मुलांमध्ये होणारा सततच्या आजारांपैकी एक आजार आहे. बालपणी संक्रमण किंवा जीनसंबंधी झालेल्या काही कारणामुळे हा आजार रोखला जाऊ शकत नाही. पण लहान वयात दमा हा आजार होण्याचं एकमेव कारण हे लठ्ठपणा असून शकतं. वजन नियंत्रणात ठेवलं तर हा आजार रोखला जाऊ शकतो. त्यामुळे हे स्पष्ट होतं की, लहान मुलांना कोणत्या ना कोणत्या शारीरिक क्रिया करायला लावायला हव्यात, जेणेकरुन त्यांचं वजन नियंत्रणात राहिल.
लहान मुला-मुलींमध्ये दम्याची लक्षणे-कारणे
काही औषधे (ऍस्प्रीन व तत्सम स्टेरोईड नसलेली औषधे), मुलाचे जन्मावेळी कमी असलेले वजन आणि श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव, तणाव व शारीरिक कष्टामुळे दमा होऊ शकतो. तसेच हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपणा यामुळेही दम्याचा विकार बळावतो. वाढते शहरीकरण हे दम्याचे प्रमुख कारण बनत आहे. अजूनही घरातील ऍलर्जिक घटकांचा पूर्ण अभ्यास न झाल्यामुळे यातील धोक्याची संपूर्ण कल्पना आपल्याला आलेली नाही.
लहान मुलांना सतत खोकला येणे, श्वास घेताना किंवा सोडताना आवाज येणे, श्वास कमी घेता येणे, छातीत वेदना होणे, घाबरणे, अस्वस्थता जाणवणे, सतत थकवा जाणवणे ही काही मुख्य लक्षणे सांगितली जातात.
दम्याने ग्रस्त मुलांची काळजी कशी घ्याल?
ज्यांना आधीच दमा झाला आहे त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचे कपडे रोज गरम पाण्याने धुवावेत, लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवा, त्यांना वेळेवर औषधे द्यावीत, त्यांच्याजवळ इनहेलर नेहमी ठेवा, रोज हलका व्यायम करावा आणि त्यांना धूळ-मातीपासून दूर ठेवावे.