अंतराळ प्रवासाचा मेंदूवर होतो प्रभाव - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:08 AM2018-11-15T11:08:05+5:302018-11-15T11:08:17+5:30
जर्मनीतील म्यूनिच येथील लुडविद मॅक्सीमिलियन यूनिव्हर्सिटी (LMU) च्या अभ्यासकांनी याबाबत अभ्यास केला.
रशियातील काही अंतराळविरांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार हे समोर आलं आहे की, अंतराळात फार जास्त काळ घालवल्यानंतर त्या व्यक्तींच्या केवळ मांसपेशी आणि हाडांचच नुकसान होतं असं नाही, तर त्यांच्या मेंदूवरही याचा खोलवर परिणाम होतो. एलएमयूचे प्राध्यापक पीटर जू यूलेनबर्ग म्हणाले की, 'अशाप्रकारचं हा पहिलाच शोध आहे. ज्यात अंतराळ मिशननंतर मेंदूच्या संरचनेमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे'.
जर्मनीतील म्युनिक येथील लुडविद मॅक्सीमिलियन यूनिव्हर्सिटी (LMU) च्या अभ्यासकांनी याबाबत अभ्यास केला. यात सहभागी अभ्यासकांनी सांगितले की, मेंदूतील वेगवेगळ्या पेशी अंतराळातील गुरुत्वाकर्षणावर कशी प्रतिक्रिया देतात, याबाबत फार स्पष्टता नाही. तसेच सामान्य गुरुत्वाकर्षणात परत आल्यावर मेंदूतील संरचनेमध्ये काही बदल होतो का किंवा नाही. जर बदल होत असेल तर हा बदल कसा असेल, हे सुद्धा स्पष्ट नाही, असे ते म्हणाले.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित या अभ्यासात दाखवण्यात आले आहे की, मेंदूतील तीन मुख्य ऊती(पेशी)च्या गटात येणाऱ्या बदलाची माहिती मोहिम संपल्यानंतर कमीत कमी ६ महिन्यात मिळवता येऊ शकते. हा अभ्यास १० अंतराळ वीरांवर केला गेला. या सर्वच लोकांनी अंतराळात सरासरी १८९ दिवस घालवले होते.
अंतराळात राहणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूवर होणाऱ्या प्रभावाची माहिती घेण्यासाठी अभ्यासकांनी मॅग्नेटिक रेजोनेन्स टोमोग्राफी (MRT) तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मेंदूचे काही फोटो काढले गेले. काही फोटो अंतराळवीर अंतराळ प्रवासाला जाण्यापूर्वी आणि काही फोटा नंतर बऱ्याच कालावधीने ते परत आल्यावर घेतले गेले. त्यासोबतच ७ अंतराळवीरांच्या मेंदूची तपासणी त्यांच्या ७ महिन्यांच्या प्रवासानंतर केली गेली.