नैराश्य, निद्रानाशासारख्या समस्यांवरील उपचारासाठी केला जातो "गांजा"चा वापर, रिसर्चमधून मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 09:24 AM2020-10-09T09:24:48+5:302020-10-09T09:38:33+5:30
Cannabis To Treat Common Health Conditions : चिंता, नैराश्य, झोपं न येणं यासारख्या शरीराशी निगडीत असलेल्या गोष्टींवर उपचार करण्यासाठी गांजाचा वापर केला जात असल्याची माहिती मिळत आहे.
आरोग्याशी संबंधित अनेक अडचणींचा सामना हा लोकांना करावा लागत आहे. निरोगी आरोग्यासाठी अथवा एखादा आजार असल्यास त्यावर उपचार म्हणून विविध औषधी वनस्पतींचा वापर हा आवर्जून केला जातो. मात्र आता संशोधनातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चिंता, नैराश्य, झोप न येणं यासारख्या शरीराशी निगडीत असलेल्या गोष्टींवर उपचार करण्यासाठी "गांजा"चा वापर केला जात असल्याची माहिती मिळत आहे. विशेषत: प्रौढ मंडळी याचा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे.
निद्रानाश, चिंता, वेदना तसेच नैराश्य यासारख्या गोष्टींवर उपचार म्हणून गांजाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (यूसी) सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी दिली आहे. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये हा रिसर्च ऑनलाईन प्रकाशित करण्यात आला आहे. काही प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गांजाचा वापर हा अनेक ठिकाणी केला जात आहे. या रिसर्चसाठी 568 रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
निद्रानाश, नैराश्य आणि चिंता या कारणांसाठी गांजाचा वापर
सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या रुग्णांपैकी जवळपास 15 टक्के लोकांनी गेल्या तीन वर्षांत गांजाचा वापर केला होता. तर त्यातील निम्मे वापरकर्ते नियमितपणे गांजा आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने त्याचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. वेदना, निद्रानाश आणि चिंता या कारणांसाठी गांजाचा वापर करणं ही सर्वात सामान्य कारणे होती अशी माहिती क्रिस्तोफर कॉफमन यांनी दिली आहे. क्रिस्तोफर हे यूसी सॅन डिएगो येथे मेडिसिन विभागातील जेरियाट्रिक्स आणि जेरंटोलॉजी विभागाचे अभ्यासक आणि सहाय्यक प्राध्यापक आहेत.
"व्यसन म्हणून नाही तर आरोग्याशी संबंधित आजारांवर उपयुक्त"
10 आठवड्यांच्या कालावधीत यूसी सॅन डिएगो हेल्थ येथील सीनिअर्स क्लिनिक फॉर सीनिअर्स क्लिनिकमध्ये हे सर्व्हेक्षण केले गेले. गांजाचा वापर करणाऱ्या 61 टक्के रुग्णांनी वयाच्या 60 व्या वर्षांनंतर त्याचा वापर करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. गांजाचं सेवन करणाऱ्या काही मंडळींनी व्यसन म्हणून नाही तर आरोग्याशी संबंधित आजारांवर हे उपयुक्त ठरत असल्याने याचा वापर केल्याची माहिती दिली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.