मुल रडायला लागल्यावर लगेच त्याला जवळ घेता का? तुमची ही सवय मुलासाठी पडू शकते महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 10:07 AM2020-03-16T10:07:27+5:302020-03-16T10:07:51+5:30
काही पालकांना वाटतं की, त्यांचं बाळ रडायलाच नको. बाळ रडायला लागलं की, लगेच त्याला गप्प करू लागतात. पण लहान मुलांचं रडणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.
लहान मुलं खूप रडतात आणि मग आई-वडील बाळाचं रडणं थांबवण्यासाठी काय काय करतात हे तुम्ही पाहिलं असेलच. काही पालकांना वाटतं की, त्यांचं बाळ रडायलाच नको. बाळ रडायला लागलं की, लगेच त्याला गप्प करू लागतात. पण लहान मुलांचं रडणं हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. असं आम्ही नाही तर एक रिसर्च सांगतोय. एका रिसर्चनुसार, ३ महिन्यांपासून ते १८ महिन्याच्या बाळांना काही वेळ रडू द्यावं. ते रडल्यावर तुम्ही लगेच त्यांच्याजवळ जात असाल किंवा त्यांना जवळ घेत असाल तर याने त्यांच्या विकासावर प्रभाव पडू शकतो.
(Image Credit : snopes.com)
ब्रिटनच्या वारविक युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी एक रिसर्च केला असून त्यात हा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यानुसार, जन्मापासून ते दीड वयापर्यंतच्या लहान मुलांना थोडा वेळ रडू दिलं तर त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता मजबूत होते. सोबतच ते हळूहळू स्वत:वर कंट्रोल ठेवण्याची त्यांना सवयही लागते. मात्र, ते रडत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावं.
(Image Credit : momjunction.com)
लहान मुलांची रडण्याची पद्धत, व्यवहार आणि यादरम्यान आई-वडिलांची प्रतिक्रिया याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांनी सात हजारपेक्षा जास्त लहान मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांचा अभ्यास केला. काही काही वेळाने त्यांचं मूल्यांकन केलं गेलं की, जेव्हा बाळ रडतं तेव्हा आई-वडील लगेच हस्तक्षेप करतात की त्यांना काही वेळ रडू देतात. या प्रयोगाचं मूल्यांकन दर ३, ६ आणि १८ महिन्यांमध्ये करण्यात आलं.
काय आढळून आलं?
(Image Credit : goodtoknow.co.uk)
प्रयोगात हे बघण्यात आलं की, रडण्यादरम्यान आई-वडील दूर राहण्यात आणि पुन्हा बाळाजवळ येण्याने बाळाच्या व्यवहारात किती फरक पडला. याच्या निष्कर्षातून समजलं की, ज्या बाळाचे आई-वडील ते रडल्यावर लगेच त्याच्याजवळ येत होते, त्या बाळाचा विकास हळू झाला. तर जे आई-वडील त्यांच्या बाळाला थोडा वेळ रडण्यासाठी सोडत होते त्या बाळाची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढली होती. ते इतर बाळांच्या तुलनेत अधिक चंचल आणि सक्रिय होते.
रिसर्चदरम्यान बाळांचं संगोपन, रडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि आई-वडिलांच्या व्यवहाराचा अभ्यास करण्यात आला. या रिसर्चचे मुख्य डॉ. एयटन बिलगिन यांनी सांगितले की, आम्ही ३ ते १८ महिन्यांच्या बाळांच्या ७ हजारपेक्षा जास्त मातांचा अभ्यास केला. त्यांच्या व्यवहाराचा अभ्यास केला. त्यात दिसून आलं की, त्या किती संवेदनशील आहेत आणि बाळांवर काय परिणाम होतो.