७ पैकी १ भारतीय 'या' गंभीर आजाराने पीडित, पण कुणाला काही पडलीच नाहीये!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 09:57 AM2019-12-24T09:57:29+5:302019-12-24T09:59:57+5:30
दलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात.
(Image Credit : phunuonline.com.vn)
बदलत्या लाइफस्टाईलमुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. तसंच अनेकजण मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष करतात आणि नंतर त्यांना जास्त समस्यांचा सामना करावा लागतो. भारतीय लोकांच्या मानसिक आरोग्याबाबत एक रिसर्च समोर आला असून हा रिसर्च लॅन्सेट सायकायट्री नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चनुसार, देशातील प्रत्येकी ७ पैकी १ भारतीय गंभीर मानसिक आजाराने पीडित आहे. ही आकडेवारी २०१७ असून आता ही वाढली असण्याचीही शक्यता आहे.
किती लोक मानसिक आजारांनी पीडित?
(Image Credit : psycom.net)
हा रिसर्च ‘इंडिया स्टेट लेवल डिजीज बर्डन इनिशिएटिव्ह’ने केला आहे. या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, डिप्रेशन आणि एग्जायटी म्हणजे अस्वस्थता सर्वात कॉमन मानसिक आजार आहे. आणि देशात या दोन आजारांनी पीडित लोकांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. भारतात १९९० पासून ते २०१७ म्हणजे २७ वर्षाच्या आकडेवारीवर आधारित हा रिसर्च आहे. यात सांगण्यात आले आहे की, भारताच्या १९.७ म्हणजे साधारण २० कोटी लोक मानसिक आजाराने पीडित आहेत आणि हा एकूण लोकसंख्येचा १४.३ टक्के भाग आहे. यातील ४.६ कोटी लोक डिप्रेशन आणि ४.५ कोटी लोक एग्जायटीने पीडित होते.
काय आहे कारणे?
एम्सचे सायकायट्रीचे प्राध्यापक आणि या रिसर्चचे मुख्य डॉ. राजेश सागर म्हणाले की, 'डिप्रेशन आणि एंग्जायटी या दोन्ही समस्यांचं कारण आहे स्ट्रेस. तेच लहान मुलांबाबत सांगायचं तर त्यांना भिती दाखवल्याने, धमकावल्याने या दोन मानसिक समस्या बघायला मिळतात. इतकेच नाही तर सामाजिक परिस्थितीत होत असलेल्या बदलांमुळेही लोकांमध्ये स्ट्रेस वाढतो. आधी संयुक्त परिवार असायचे आणि लोक आपल्या समस्या एकमेकांसोबत शेअर करून मन हलकं करायचे. पण आता हे शक्य नाही.
कुणाला जास्त डिप्रेशनची समस्या
रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, मध्यम वयाचे लोक डिप्रेशनने अधिक पीडित असतात. सोबतच डिप्रेशनचा संबंध भारतात होणाऱ्या आत्महत्यामुळेही आहे. मानसिक आजारांचा आकडा १९९० ते २०१७ दरम्यान दुप्पटीने वाढला आहे.