नऊ महिन्यांच्या वायूवर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
By स्नेहा मोरे | Published: September 13, 2022 08:12 PM2022-09-13T20:12:57+5:302022-09-13T20:13:11+5:30
काकीने केला यकृताचा काही भाग दान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सहा दिवसांच्या वायू विसावदिया या बाळाला जन्मतःच पित्तनलिका नसल्याचे निदान झाले. त्यामुळे अवघ्या काही दिवसांच्या या बाळावर आतडे यकृताला जोडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु ही शस्त्रक्रिया अयशश्वी झाल्याने बाळाला यकृताचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. त्यानंतर या चिमुरड्याचा जीव वाचविण्यासाठी नऊ महिन्यांच्या या बाळाला त्याच्या काकीने यकृताचा काही भाग देऊन नवा जन्म दिला आहे.
यकृत निकामी होण्याच्या स्थितीत असलेल्या वायूकडे यकृत रोपणाचा पर्याय होता . वायूचे आई- वडिल यकृत दान करण्यास योग्य नसल्यामुळे त्याची काकी विधी विसावदिया ज्यांचे एकच महिन्यापूर्वीच लग्न झाले होते त्यांनी स्वेच्छेने त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्याचे मान्य केले. विधी यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता तर वायूचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह होता.
नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रियेत सहभागी असलेले पेडिअॅट्रिक हेपटोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीतज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले, पश्चिम भारतात प्रथमच ह्यावेळी डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला व त्यानंतर एका नऊ महिन्यांच्या बालकाची यशस्वी एबीओआय यकृतारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. 18 ऑगस्ट रोजी वायूची जिवंत दात्याने दिलेल्या यकृताच्या रोपणाची यशस्वी एबीओआय शस्त्रक्रिया करण्यात आली. वायूच्या वैद्यकीय स्थितीमुळे त्याची रोपण शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक होती.
शस्त्रक्रियेस सहा तासांपेक्षा अधिक वेळ - डॉ. अनुराग श्रीमाल, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियातज्ज्ञ
बाळाच्या स्वादुपिंडाच्या खाली असलेल्या प्लिहेच्या शीरेपर्यंत आणि सुपिरियर मेसेन्टेरिक व्हेन (एसएमव्ही) पर्यंत पोहोचलो. त्यानंतर सांध्यातून रोपण केलेल्या यकृताला प्रवाह उपलब्ध करून दिला . अशा प्रकारे अॅट्रेटिक पोर्टल व्हेनला बायपास केले. शस्त्रक्रियेच्या सहा तास 30 मिनिटांच्या कालावधीत प्रत्येक स्थिती उत्तम प्रकारे हाताळण्यात आली. वायूने उपचारांना अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि दहा दिवसांच्या आत त्याला डिस्चार्ज देता येईल इतकी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली