अकाली हृदयविकाराचा झटका... महिलांनो, वेळीच ओळखा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 03:03 PM2018-02-28T15:03:23+5:302018-02-28T15:03:23+5:30

गेले दोन दिवस आपण सगळेच अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूच्या कारणांबद्दल चर्चा करतोय. त्याबाबत निरनिराळे व्हॉट्स अॅप मेसेज फिरताहेत.

sudden cardiac arrest causes and precautions | अकाली हृदयविकाराचा झटका... महिलांनो, वेळीच ओळखा धोका!

अकाली हृदयविकाराचा झटका... महिलांनो, वेळीच ओळखा धोका!

Next

- डॉ. नेहा पाटणकर

गेले दोन दिवस आपण सगळेच अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूच्या कारणांबद्दल चर्चा करतोय. त्याबाबत निरनिराळे व्हॉट्स अॅप मेसेज फिरताहेत. या मेसेजमधील कारणमीमांसा कितपत गांभीर्याने घ्यायची, हे ज्याने-त्यानेच ठरवायचं; एक निष्कर्ष अगदी खरा आहे की हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू येणाऱ्यांची संख्या शतपटीने वाढलेली दिसते. रोज आपल्याला दिसणारा माणूस अचानक आपल्यातून नाहीसा होतो आणि या सगळ्यांची वयंही अगदी कमी असतात. आणखी घाबरवणारी गोष्ट म्हणजे यात महिलांचं प्रमाणही वाढायला लागलं आहे. आत्तापर्यंत पन्नाशीच्या पुढे आणि त्यातही पुरुष मंडळींमध्ये हृदयविकाराचा झटका ही सामान्य बाब होती. मग आत्ताच गेल्या १०-१५ वर्षांत हा ट्रेंड का बदलला? 

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी एक मैत्रीण तिच्या दुसऱ्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती. अचानक त्या मैत्रिणीचा फोनवर येणारा आवाज बंद झाला. फोनवरून तिला काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज आला. ही मैत्रीण तिच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहणारी. आज ती मुलांना शाळेत घेऊन जाणार होती, म्हणून हिने फोन केला होता. फोन चालूच होता आणि तिच्या मुलीचा 'आई उठ, आई उठ' असा आवाज ऐकू येऊ लागला. ही मैत्रीण बाजूच्या इमारतीत धावली. पण, हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तिच्या मैत्रिणीने जगाचा निरोप घेतला होता. वय जेमतेम ४३ वर्षं.

ही आहेत कारणं

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं, याचं कारण त्यांच्यातील इस्ट्रोजन हार्मोन्स हे आहे. हे हार्मोन्स मासिक पाळी येणं बंद झाल्यानंतर हळूहळू कमी होतात. पण हल्ली मासिक पाळी सुरू होण्याचं वय ७ ते ८ वर्षांवर आलंय. मेनोपॉज साधारण चाळीसच्या अलीकडे-पलीकडे येतो. म्हणजेच, करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना त्या इस्ट्रोजनचं कवच हरवून बसतात. 

तसंच, आता पुरुष आणि स्त्रिया यांच्यात आर्थिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांसोबतच, स्ट्रेस, डिप्रेशन, कोलेस्टेरॉल, सिगारेट, अल्कोहोलचं प्रमाणही समसमानच दिसतं. स्त्रियांवर घरची जबाबदारी अधिकच असते. या सगळ्या धबडग्यात व्यायामाला, अॅरोबिक्सला वेळच उरत नाही. प्रेग्नन्सी, बाळंतपणामुळे फॅट्स वाढत जातात. ते आटोक्यात येत नाहीत. अशातच, बऱ्याचदा काही त्रास होत असेल तर दुर्लक्ष करण्याचं बायकांचं प्रमाण जास्त असतं. ते धोकादायक ठरू शकतं. 

पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवताना त्यांच्या जीवनशैलीतील वाईट गोष्टीही स्त्रियांनी स्वीकारलेल्या दिसतात. बऱ्याच जणी सिगारेट आणि मद्याच्या आहारी गेल्याचंही दिसतं. सिगारेटमुळे भूक लागत नाही आणि वजन आटोक्यात राहतं, पण त्यातील तंबाखूमुळे अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. कारण, धमन्या आकुंचित पावल्यानं रक्तपुरवठा तत्काळ बंद होतो. 

मधुमेह झाला असेल तर त्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, असं गृहित धरूनच आम्ही डॉक्टर मंडळी त्याच्यावर उपचार करत असतो. मेओ क्लिनिकच्या एका संशोधनाप्रमाणे, ५० वर्षांच्या आतील स्त्रियांना spontaneous coronary artery dissection हा धोकाही संभवतो. तो अत्यंत दुर्मिळ आहे.  त्यात अचानक हृदयाची एखादी रक्तवाहिनी फुटते. हे बायकांमध्ये जास्त दिसतं. 

ही लक्षणं दिसल्यास सावधान!

अचानक चक्कर येणं, छातीत धडधडणं, घाम फुटणं, घशात अडकल्यासारखं वाटणं असं व्हायला लागलं तर त्वरित हॉस्पिटल गाठावं. पण बायकांना आपली कामं वेळच्या वेळी हातावेगळी करणं जास्त महत्त्वाचं. त्या या सगळ्या वॉर्निंग सिग्नल्सकडे दुर्लक्ष करतात. 

A stitch in time saves nine या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने काळानुसार आणि जीवनशैलीनुसार, नवनवीन आजारांची अगदी प्राथमिक लक्षणं ओळखून त्यावर त्वरित उपाययोजना करणं हितकारक आहे.

Web Title: sudden cardiac arrest causes and precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.