‘साखरेचे खाणार, त्याला देव लवकर नेणार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 06:53 PM2017-09-15T18:53:09+5:302017-09-15T18:55:01+5:30
साखरेच्या घातक व्यसनापासून स्वत:ला कसं करणार मुक्त?
- मयूर पठाडे
‘साखरेचे खाणार, त्याला देव देणार’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. खरं तर या म्हणीचा अर्थ आहे, जो चांगली इच्छा करतो, त्याला फळही तसं चांगलंच मिळतं.. जशी इच्छा तसे फळ.. पण या म्हणीचा जर शब्दश: अर्थ घेऊन साखर जास्त खायला लागलात, तर मात्र अगदीच विपरित परिणाम होईल. शास्त्रज्ञांचं तर सरळच म्हणणं आहे, ‘साखरेचे खाणार, त्याला देव लवकर नेणार’ ! अर्थातच जास्त गोडखाऊंचं आयुष्य कमी असतं हे शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रयोगांनी सिद्धही केलं आहे.
साखरेचं व्यसन सर्वात घातक. कारण हे व्यसन सुटता सुटत नाही. कारण आपल्याला हे व्यसन आहे, हेच अनेकांना कळत नाही, पण त्यासाठी वेळीच आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर साखरेचं व्यसन नक्कीच आटोक्यात येऊ शकतं आणि त्यापासून आपल्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणामही आपण टाळू शकतो.
त्यासाठी मनापासून आणि चिकाटीनं प्रत्यन मात्र करावे लागतील.
साखरेचं व्यसन सोडण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्याचं पालन केलं तरी साखरेच्या या ‘गोड’ आजारापासून आपण दूर राहू शकतो.
साखरेचं व्यसन कसं सोडाल?
१- प्रोसेस्ड फूड खाण्याची आपल्याला आता इतकी सवय आहे की त्याशिवाय खरोखरच आपलं पान हलत नाही. दुकानातही तयार मिळणाºया या पदार्थांपासून शरीराची खूप मोठी हानी होते. मुख्य म्हणजे साखरेसारखीच या गोष्टींची चटक लागते. ती आपल्याला सोडवत नाही. त्यामुळे प्रोसेस्ड फूडची सवय आपल्याला अगोदर मोडायला हवी. ही सवय जर मोडली तरी बºयाच प्रमाणात साखरेचं व्यसन आटोक्यात येऊ शकतं.
२- आपल्या शरीरात सेरोटेनिन नावाचं हार्मोन असतं. या हार्मोनला ‘हॅपिनेस हार्मोन’ असं म्हटलं जातं. हे हार्मोन आपल्या शरीरात वाढावं यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्थात ते नैसर्गिकरित्या वाढायला हवं. नियमित व्यायाम, योग्य आणि पुरेशी झोप, हेल्दी डाएट.. इत्यादि गोष्टींमुळे आपल्या शरीरातील सेरोटेनिन हार्मोन्सची मात्रा वाढू शकते. त्यामुळे अर्थातच गोड खाण्याची तुमची इच्छाही कमी होते.
३- अति गोड खाण्याची जी अांपली इच्छा आहे, ती नैसर्गिकरित्या भागवली गेली तर साखर किंवा साखरेचे पदार्थ खाण्याची मग गरज पडणार नाही. नॅचरल स्विटनर्समध्ये शून्य कॅलरीज असतात, शिवाय आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण त्यामुळे वाढत नाही. शिवाय साखरेपेक्षा ते गोड असतात. त्यामुळे हे नॅचरल स्विटनर्स जर आपण खाल्ले तर साखरेची आपली तीव्र आकांक्षा कमी होऊ शकते.
४- आहारातील, आपल्या ताटातील हिरवा रंग वाढवायला हवा. ग्रिन ड्रिंक्समुळेही आपल्या शरीराला अत्यावश्यक घटक मिळतात आणि साखरेची चटकही कमी होते.
साखरेची चटक सोडण्यासाठी आणखीही काही उपाय आहेत. ते पाहूया पुढच्या भागात..