डोळ्याखाली सुज आली आहे? असु शकतो 'हा' गंभीर आजार, त्वरित जाणून घ्या यावरचे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:48 PM2022-08-29T14:48:21+5:302022-08-29T14:50:17+5:30
कधीकधी ही समस्या शरीरातील निर्जलीकरणामुळे (Dehydration) देखील होते. जाणून घेऊया काय आहे हा आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपायांविषयी सविस्तर.
तुम्ही पाहिले असेल अनेकांच्या डोळ्याखालचा भाग सुजलेला दिसतो. ही सूज वेगवेगळ्या कारणांमुळे आलेली असू शकते. डोळ्यांखाली येणारी सूज आणि तणावामुळे डोळे थकलेले वाटणे याला वैज्ञानिक भाषेत आय बॅग्ज म्हटले जाते. जस जसे वय वाढत जाते तशी ही समस्या देखील वाढत जाते. या आजारात डोळ्यांखाली द्रव किंवा चरबी जमा होते. हा आजार एका डोळ्यातून दुसऱ्या डोळ्यातही पसरू शकतो. कधीकधी ही समस्या शरीरातील निर्जलीकरणामुळे (Dehydration) देखील होते. जाणून घेऊया काय आहे हा आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपायांविषयी सविस्तर.
आय बॅग्जची कारणे
डोळ्यांभोवती द्रव साचल्यास आय बॅग्जचा त्रास होऊ शकतो. तसेच जास्त मीठ खाल्ल्याने देखील आय बॅग्ज होतात. याशिवाय प्रदूषण किंवा धुळीच्या ऍलर्जीमुळे डोळ्याखाली सूज येऊ शकते. तसेच पुरेशी झोप घेतली नाही तरी देखील ही समस्या उद्भवते. काही वेळा जास्त रडल्यामुळे देखील डोळ्यांखाली सूज येऊ शकते. काही जणांना वाढत्या वयानुसार देखील हा त्रास जाणवतो. वय वाढते तसे डोळ्यांच्या ऊती कमकुवत होतात आणि चरबी खालच्या पापण्यांवर जमा होते. त्यामुळे डोळ्यांखाली सूज येते.
आय बॅग्जवर उपाय
आय बॅग्जची समस्या टाळण्यासाठी किंवा आय बॅग्ज दूर करण्यासाठी तुम्ही काही काळजी घेऊ शकता. तसेच काही उपाय देखील करू शकता. आय बॅग्ज टाळण्यासाठी तुमचे शरीर शक्य तितके हायड्रेटेड ठेवा, भरपूर पाणी प्या. तसेच आय बॅग्ज झाल्यास बटाट्याची साल आणि काकडीसारख्या थंड वस्तू डोळ्यांखाली लावा. याशिवाय तुम्ही बर्फाने देखील हलका मसाज करू शकता. यासाठी तुम्ही टी बॅग्जचा वापर करू शकता. आय बॅग्जची समस्या टाळण्यासाठी डोळ्यांचा मेकअप करणे टाळा. तसेच सकस आहार घ्या आणि डोळ्यांचे व्यायाम करा. डोळे नेहमी स्वच्छ ठेवा आणि चांगली झोप घ्या. तुम्ही आय बॅग्ज कमी करण्यासाठी डोळ्याखाली खोबरेल तेल देखील लावू शकता.
टी बॅग्जचा वापर कसा करावा?
आय बॅग्जची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही टी बॅग्जचा देखील वापर करू शकता. यासाठी टी बॅग 5 मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा, त्यानतंर ती टी बॅग 20 मिनिटे फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी पिळून घ्या आणि ती टी बॅग डोळ्यांखाली लावा. यामुळे तुम्हाची समस्या दूर होऊ शकते.