स्वाइन, लेप्टोचा धोका वाढतोय, पालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन
By स्नेहा मोरे | Published: September 13, 2022 08:18 PM2022-09-13T20:18:07+5:302022-09-13T20:20:29+5:30
गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर सुरु झालेला पाऊस आजारांना निमंत्रण देत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गणेशोत्सवाच्या विसर्जनानंतर सुरु झालेला पाऊस पुन्हा एकदा आजारांना निमंत्रण देत आहेत. पालिकेच्या अहवालानुसार , १ ते ११ सप्टेंबर या काळात मुंबईत मलेरियाचे २०७ रुग्ण आढळले आहेत, तर गॅस्ट्रोच्याही १२१ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईमध्ये १ ते २८ ऑगस्ट दरम्यान मलेरियाचे ७३६ रुग्ण, लेप्टोचे ६१, डेंग्यूचे १४७, गॅस्ट्रोचे ४४४, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर एच १ एन १ च्या १८३ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील महिन्यात म्हणजेच जुलै २०२२ मध्ये मलेरियाचे ५६३ रुग्ण, लेप्टोचे ६५, डेंग्यूचे ६१, गॅस्ट्रोचे ६७९, हेपेटायसिसचे ६५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १०५ रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईमध्ये स्वाईन फ्लू आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे अन्यथा त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
आजार - ११ सप्टेंबरपर्यंतची संख्या - १ ते ११ सप्टेंबर या कालावधीतील रूग्ण
मलेरिया - २०७ - २७९९ (१ मृत्यू )
लेप्टो - १८ - १८१ (१ मृत्यू)
डेंग्यू - ८० - ४३३
गॅस्ट्रो - १२१ - ४१७३ (२ मृत्यू)
हेपेटायटिस - १४ - ३८३
चिकनगुनिया - २ - १२
स्वाईन फ्लू - ६ - ३०४ (२ मृत्यू)