Polycystic Ovarian Syndrome : महिलांनो, वेळीच ओळखा या सिंड्रोमची लक्षणं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 05:13 PM2018-05-28T17:13:34+5:302018-05-28T17:13:34+5:30
गेल्या काही वर्षात PCOS हे नाव सतत कुठे ना कुठे भेटतच आहे. यत्र, तत्र, सर्वत्र बोकाळलेलं हे नाव असलेलं हे प्रकरण आहे तरी काय?
- डॉ. नेहा पाटणकर
ट्रेनमधून प्रवास करत होते. गर्दीची वेळ आणि गच्च भरलेली गाडी. एकमेकांना चिकटून सगळे प्रवासी उभे. माझ्या बाजूची मुलगी तेवढ्यातसुद्धा कानात हेडफोन्स लावून कोणाशीतरी तावातावाने भांडत होती. थोड्या वेळानंतर ती दुसऱ्या फोनवर बोलताना ढसाढसा रडली. तिच्याकडच्या मोठ्या बॅगसदृश पोतडीमधून बऱ्याचशा गोष्टी माझ्या शरीरात घुसू पाहात होत्या. मी तिला रागावून तिच्यावर खेकसणारच होते, इतक्यात तिच्या चेहऱ्यावरील काही गोष्टींनी माझं लक्ष वेधून घेतलं.
विशीच्या अलीकडे-पलीकडे वय. अंगकाठी जाडेपणाकडे असूनही अत्यंत टाईट कपडे. मला तिच्या हनुवटीवर दाढीसारखे खुंट दिसले. चेहऱ्यावर मेकअप लावून पिंपल्स झाकण्याचा प्रयत्न केला होता. एवढ्या मेकअपच्या थरातूनही डोळ्याखालची वर्तुळं लपत नव्हती. हेयरस्टाईलच्या मधूनमधून डोक्यावरची त्वचा डोकावत होती. मी टिपलेली ही निरीक्षणं तर PCOS च्या लक्षणांशी अगदी तंतोतंत जुळत होती. खरंच तिला PCOS म्हणजे Polycystic Ovarian Syndrome असेल का?
गेल्या काही वर्षात PCOS हे नाव सतत कुठे ना कुठे भेटतच आहे. यत्र, तत्र, सर्वत्र बोकाळलेलं हे नाव असलेलं हे प्रकरण आहे तरी काय?
अंडाशयात तयार झालेल्या फॉलिकल्समधून बीज बाहेर न पडता त्याच्या बाजूला आवरण तयार होतं. त्याची सिस्ट तयार होते. शरीरामध्ये पुरुषी (male)हार्मोन अँड्रोजेन जास्त प्रमाणात पाझरतं. अँड्रॉजेन्सचं इस्ट्रोजेन बनण्याची प्रक्रिया बंद होते. प्रोजेस्टेरॉनचं प्रमाणही कमी होतं. या सगळ्या हार्मोन्सच्या उलथापालथीमुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या अनियमितपणाबरोबरच नको त्या ठिकाणी लव येणे (चेहऱ्यावर केसांची लव), केस गळणे, केस पातळ होऊन टक्कल (male type baldness)या तक्रारी सुरू होतात. डोकेदुखी, थकवा, ओटीपोटात दुखत राहणं, मूड स्विंग्स, चिडचिड, नैराश्य अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.
शरीरातल्या वेगवेगळ्या क्रिया-प्रक्रिया चुकीच्या मार्गांनी जायला लागतात. या सगळ्यांच्या चेन रिअॅक्शनमुळे एका दुष्टचक्राला शरीर बळी पडतं आणि मग हे चालूच राहिलं तर वजन वाढणं, डायबेटिस होणं इथपर्यंत वाटचाल सुरू होते. या सगळ्या एकत्रित लक्षणांना PCOS म्हणतात.
काय आहे कारण?
या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे आपल्या धकाधकीच्या वेगवान आयुष्यातले ताण-तणाव आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांच्याशी आपल्या शरीराला जुळवून घेणं खूप कठीण जातं आहे. आपल्या झोपेच्या चुकीच्या वेळापत्रकाचा शरिरातील अंतःस्त्रावी ग्रंथींच्या म्हणजेच आपल्या हार्मोन्सच्या लयीवर परिणाम होतो. हल्लीच्या मॉल संस्कृतीमधल्या आपल्या जेवणात अति प्रमाणात कर्बोदकांचा समावेश असतो. आपण त्याला सोशलायझिंग असं गोंडस नाव देतो. अति जास्त कर्बोदकं हाताळण्यासाठी खूप जास्त इन्सुलिन पाझरलं तरी ते चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत नाही. यालाच insulin resistance म्हणतात. हीच खरी PCOS च्या निर्मितीची पहिली पायरी आहे. रक्तामध्ये खूप जास्त प्रमाणात इन्सुलिन असल्याने अंडाशयामधून बीज बाहेर पडत नाही आणि इस्ट्रोजेन बनण्यामध्ये अडथळे येतात. वजन वाढतं आणि त्याचेही दुष्परिणाम दिसतात.
यातली कुठलीही लक्षणं असतील तर स्री रोग तज्ज्ञ किंवा एन्डोक्रिनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या करून त्याचे निदान होऊ शकेल.
यावरील उपचार पद्धतीमधे मुख्यत्त्वे शरीराची insulin sensitivity वाढवण्यावर भर दिलेला असतो. त्याच बरोबर जीवनशैलीमधील सकारात्मक बदल या आजाराशी दोन हात करण्याकरता सर्वोत्तम उपाय आहे.