मुंबईकरांची चिंता वाढली, प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे, दुर्लक्ष न करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:09 PM2022-11-21T13:09:00+5:302022-11-21T13:11:41+5:30
मुंबईत गोवरचा उद्रेक झाला आहे. अनेक बालके उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता मुंबईकरांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे दिसून येत आहेत.
मुंबईत गोवरचा उद्रेक झाला आहे. अनेक बालके उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. आत्तापर्यंत काही बालकांचा जीवही गेला आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मात्र आता मुंबईकरांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे. केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढांमध्येही गोवरची लक्षणे दिसून येत आहेत. १८ ते २२ वर्षे वयोगटातील दोन जणांना गोवरची लक्षणे दिसून येत आहेत.
मुंबईतील काही भागात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. एम पूर्व भागात १८ ते २२ मधील दोन संशयित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या गोवंडी परिसरात गोवरचे अनेक रुग्ण असल्याचा संशय आहे. त्यांच्या शरीरावर पुरळ आहेत. यावरुन केवळ नवजात बालके नाही तर मोठ्यांना सुद्धा गोवरची लागण होत आहे.सध्या या दोघांची प्रकृती स्थिर आहे.
मोठ्यांना गोवर होण्याचे प्रमाण तसे कमी आहे. अनोकांना आपण लहानपणी लस घेतली की नाही हे आठवतही नसेल. मात्र सध्या गोवरचा विळखा बघता मोठ्यांनाही लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे गोवर रुग्णांच्या संपर्कात येऊ नका असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहे.
महापालिका सज्ज
गोवरचा वाढता उद्रेक बघता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. गोवरविषयी जनजागृती केली जात आहे. ताप, अंगावर पुरळ यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयात जाण्याचे आवाहन केले जात आहे. तर धारावीत प्रत्येक घरात जाऊन लसीकरण, विचारपुस केली जात आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक प्रबोधनासाठी धर्मगुरुंची मदत घ्या असे आवाहवन केले आहे.