CoronaVirus News: कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यावर किती दिवसांत होते लागण? वाचा तज्ज्ञांचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 01:10 PM2021-04-25T13:10:58+5:302021-04-25T13:11:33+5:30
CoronaVirus News: कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यावर किती दिवसांत होते लागण, किती दिवसांनंतर करायची चाचणी; वाचा तज्ज्ञांनी दिलेली उत्तरं
मुंबई: देशातील कोरोना रग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळून आले. यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा तब्बल साडे तीन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं गरजेचं आहे.
कोरोना लस घेतली अन् साईड इफेक्ट्स दिसलेच नाही, तर काय समजायचं?; तज्ज्ञ म्हणतात...
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आली. त्यावेळचा कोरोना स्ट्रेन जास्त संक्रामक नव्हता. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३० ते ४० टक्के जणांना लागण व्हायची. मात्र आताच्या स्ट्रेनमुळे ७० ते ८० टक्के जणांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार घडले आहेत. अशा स्थितीत योग्य वेळी उपचार घेणं आवश्यक आहे.
रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धत
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यावर किती दिवसांत कोरोनाची लागण होते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाला जामखेडमध्ये ५ हजार कोरोना रुग्णांना बरं करणाऱ्या डॉ. रवी आरोळेंनी उत्तर दिलं आहे. 'कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर तिसऱ्या ते पाचव्या दिवसापर्यंत लक्षणं दिसू शकतात. विषाणू शरीरात शिरल्यानंतर त्याची लक्षणं दिसण्यासाठी ४८ ते ७२ तास लागतात. आज तुम्ही संपर्कात आलात आणि उद्या लागण झाली असं होत नाही. त्यामुळे संपर्कात आले असल्यास तीन दिवसांनी चाचणी करावी. चाचणी लगेच केल्यास विषाणू आढळून येणार नाही', अशी माहिती आरोळेंनी दिली.
कोरोना लसीकरणाबद्दल नागरिकांच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. लस घेतल्यावर एक-दोन त्रास होतो. अशक्तपणा जाणवतो. ताप येतो असं म्हटलं जातं. अनेकांच्या कुटुंबीयांनी त्याचा अनुभव घेतला आहे. त्रास झाला याचा अर्थ लस लागू पडतेय, असं म्हटलं जातं. पण कोणताही त्रास झालाच नाही तर काय, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाला जामखेडमध्ये ५ हजार कोरोना रुग्णांना बरं करणाऱ्या डॉ. रवी आरोळेंनी उत्तर दिलं.
ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!
लस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, काहीच साईड इफेक्ट्स दिसले नाहीत, तरीही ती लागू झाली असं आपल्याला गृहित धरावं लागेल. कारण देशात सध्या वापरात असलेल्या दोन्ही लसींच्या चाचण्यांचे निष्कर्ष अतिशय उत्तम आहेत. कोविशील्ड असो वा कोवॅक्सिन असो, दोन्ही लस अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळे शंका घेण्याचं कारण नाही. लोकांनी निश्चिंतपणे लस घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.