उन्हाळ्यातले आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:33 PM2019-03-13T18:33:26+5:302019-03-13T18:36:08+5:30
: दिवसेंदिवस वाढते ऊन अनेकांसाठी तब्येतीच्या तक्रारी सुरु करणारे आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात फिरून डोळे दुखणे, डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा गरगरणे अशा अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागत
पुणे : दिवसेंदिवस वाढते ऊन अनेकांसाठी तब्येतीच्या तक्रारी सुरु करणारे आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात फिरून डोळे दुखणे, डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा गरगरणे अशा अनेक दुखण्यांना सामोरं जावं लागत. हे सर्व होऊ नये यासाठी अगदी लहान पण घरगुती उपाय केले तरी उन्हाळ्याच्या विकारांपासून सुटका होऊ शकते. त्यासाठी काही खास घरगुती उपाय.
- उन्हाळ्यात उन्हामुळे अनेकदा डोळे चुरचुरणे, पाणी येणे, लाल होणे अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी थंड पाण्याने (फ्रीजच्या नव्हे) डोळे धुणे महत्वाचे ठरते. शिवाय रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाण्यात बुडवलेल्या कापसाच्या घड्यांचाही फायदा होतो.
- उन्हाळ्यात शरीर उन्हात बाहेर काढण्यासाठी घामातून पाणी बाहेर काढते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे पाणी, सरबत, ताक पिणे योग्य ठरते. दोन तासांनी किमान एक ग्लास पाणी शरीरात गेलेच पाहिजे.
- उन्हाळ्यात तेलकट, मसालेदार आहार अनेकदा अपचन, पित्त, जळजळ अशा आजारांना आमंत्रण देते. या काळात हलके, बेताचे तिखट आणि मुख्य म्हणजे ताजे जेवण घ्यावे. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. त्यामुळे ताजे जेवण घेण्यावर भर द्यावा.
- उन्हामुळे त्वचा काळवंडण्याचं प्रमाणही वाढते. अशावेळी बाहेर पडण्यापूर्वी शकतो अंगभर कपडे परिधान करावेत. शिवाय उघडया भागावर सन्सक्रीम लोशन वापरण्यास विसरू नये.
- उन्हाळ्यात घट्ट, कडक, गडद कपडे वापरणे टाळावे. जीन्स तर अजिबात वापरू नये. त्याऐवजी मऊ, सुती, सौम्य रंगाचे कपडे वापरल्यास दिवस अधिक आनंददायी जाईल.
- उन्हातून थेट ए.सी.मध्ये न जाता शरीराचे तापमान आधी नॉर्मलला आणावे आणि त्यानंतर थंड हवेत जावे. त्यामुळे अंगदुखी टळते.