"पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या, पाणी उकळून प्या"; डॉ. भरत बास्टेवाड यांचा सल्ला

By निखिल म्हात्रे | Published: June 14, 2024 01:24 PM2024-06-14T13:24:10+5:302024-06-14T13:25:02+5:30

जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे

Take care of health in monsoons Drink boiled Water said Dr Bharat Bastewad | "पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या, पाणी उकळून प्या"; डॉ. भरत बास्टेवाड यांचा सल्ला

"पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्या, पाणी उकळून प्या"; डॉ. भरत बास्टेवाड यांचा सल्ला

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दुषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादुर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माश्या बसून ते दुषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, पाणी स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा यासह इतर सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत.

  • काय करावे?
  1. पिण्याचे पाणी उकळून थंड झाल्यावर शक्य असल्यास त्यात क्लोरिनचा वापर करून पिण्यास वापरावे
  2. अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत.
  3. उलट्या, जुलाब, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर झाल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन उपचार सुरू करावेत.
  4. जिल्हा परिषदेच्या व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे.
  5. ताप, मळमळ, चक्कर, उलटी, हगवण आदी गॅस्ट्रोची लक्षणे आढळल्यास रुग्णाला त्वरीत ओ.आर.एस. पाजावे व त्वरीत डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे.
  6. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करावे.
  7. नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वछ ठेवावा.

Web Title: Take care of health in monsoons Drink boiled Water said Dr Bharat Bastewad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.