या पावसाळ्यात तुमचे पोट विकारांपासून ठेवा दूर, आजपासूनच फॉलो करा 'या' टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:46 PM2021-08-02T12:46:53+5:302021-08-02T12:49:08+5:30
पावसाळी ऋतूत पाण्याशी संबंधित व्याधी अधिक प्रमाणात उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही डोकं वर काढतात. पावसाळ्यात होणारे हे विकार थोडीशी काळजी घेतली तर जवळ फिरकणारही नाहीत...
पावसाळी ऋतूत पाण्याशी संबंधित व्याधी अधिक प्रमाणात उद्भवतात. पोटाच्या तक्रारीही डोकं वर काढतात. टायफाइड, डायरिया, काविळीची साथ पसरते. अस्वच्छता, अशुद्ध पाणी आणि उघड्यावरचे पदार्थ यांच्यामुळे पावसाळ्यात होणारे हे विकार थोडीशी काळजी घेतली तर जवळ फिरकणारही नाहीत...
उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळा
पावसाळ्याच्या दिवसात तिखट कांदा भजी, बटाटावडा असे तेलकट पदार्थ खाण्याचा मोह होतोच. वडा तसेच भज्यांबरोबर दिली जाणारी ओली चटणी आरोग्याला घातक ठरू शकते. बराच काळ उघण्यावर राहिलेले खाद्यपदार्थ शरीरात इन्फेक्शन निर्माण करू शकतात. उघड्या पदार्थांवर फिरणाऱ्या माशा रोगराईचा प्रसार करतात. त्यामुळे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
पाणी उकळून प्या
पावसाळ्याच्या दिवसात पचनसंस्था आणि जठराचे काम मंदावते. परिणामी शरीरात इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पाणी उकळूनच प्या. पाणी उकळल्यामुळे त्यातील बॅक्टेरिया मरतात. पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक आजार हे पसरतात. विशेषतः पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून गार करुन प्यावे असे डॉक्टरही अनेकदा सांगतात. उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेले पाणी प्यावे.
अन्न पदार्थ ताजे खा
या दिवसांमध्ये अन्नपदार्थ जास्त प्रमाणात शिजवून घ्यावेत. जास्त शिजवलेल्या अन्नात जंतूंची वाढ होण्याचे प्रमाण कमी असते, त्यामुळे अन्न लवकर खराब होत नाही. स्वयंपाक तयार होऊन जास्त वेळ झाला असेल, तर अन्न पुन्हा गरम करा. जेणेकरून त्यात जंतू वाढण्याची शक्यता कमी होते. तसेच पावसाळ्याच्या काळात सर्व प्रकारच्या भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. फळभाज्या स्वच्छ धुतल्या नाहीत तर पोटाचे विकार होण्याची शक्यता वाढीला लागते.
तांदळाचे पाणी प्या
तांदूळ शिजविताना अनेकजण त्याचे उकळते पाणी फेकून देतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. या तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. यात अँटीइंफ्लेमेटरी, अँटीफंगल, अँटीऑक्सीडेंट असे गुणधर्म असतात. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका दुर होतो. तांदळाचे पाणी पोटाच्या विकारांवर गुणकारी असते.