तिशीनंतरचे मातृत्व काळजीचे : योग्य वयातचं घ्या मातृत्वाचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 10:01 AM2018-09-02T10:01:01+5:302018-09-02T10:01:01+5:30
उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय मानसिकदृष्ट्या तर सोपा नसतोच पण आईसोबत बाळाच्याही आरोग्याचे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होऊ शकतात
मातृत्व ही निसर्गाने स्त्री'ला दिलेली सुंदर देणगी आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषावर पालकत्व कधीही लादले जाऊ नये त्याचप्रमाणे त्यांनीही ते योग्य वयातच स्वीकारावे. उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय मानसिकदृष्ट्या तर सोपा नसतोच पण आईसोबत बाळाच्याही आरोग्याचे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होऊ शकतात.त्यामुळे वयाची तीस वर्ष पूर्ण होण्याच्या आधी आई होण्याचा पर्याय सर्वच अर्थानी योग्य ठरतो.
गर्भधारणेकरिता योग्य वय कोणते ?
२१ वर्षांनंतर सर्वसाधारणपणे स्त्रीचे शरीर गर्भधारणेस तयार होते. मात्र सध्याचा काळ बघता शिक्षण आणि करिअरमध्ये योग्य समतोल राखून २४ ते २८ वर्षांपर्यंतचे वय गर्भधारणेस योग्य ठरते. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने याबाबत योग्य विचार करून वेळप्रसंगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा.
गर्भधारणा उशिरा झाल्यास काय तोटे असतात ?
गर्भधारणा उशिरा केल्यास प्रचंड तोटे असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता कमी होत जाते. स्त्रीला डायबेटीस, बी पी, थायरॉईडसारखे आजार होऊ शकतात.योग्य वयात प्रेग्नन्सी काळात शरीर सुलभरितीने मदत करते त्याप्रमाणे वाढत्या वयात होत नाही.
वयाची तिशी उलटल्यावर गर्भधारणेच्यादृष्टीने स्त्रीला कोणत्या समस्या भेडसावतात ?
गर्भशयात स्त्रीबीज तयार होण्याची क्षमता ३० वर्षांनंतर कमी होते. त्यामुळे अनेकदा गर्भ राहात नाही.त्यातच बाळाला व्यंग असण्याची चिन्हेही वाढतात.त्या काळात गर्भपाताची काही शक्यता प्रमाणात वाढते. डाउन्स सिंड्रोमसारखे आजारही होऊ शकते.
डाएट केल्यास त्याचा परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतो का ?
नक्कीच होतो. तुम्ही केलेले क्रॅश डाएट शरीरावर परिणाम करत असते.अति आणि चुकीच्या पद्धतीने केलेले डाएट शरीराचा आणि हार्मोन्सचा समतोल बिघडवू शकते.जसे वजन घटवण्यासाठी केलेले अतिरेकी डाएट भयानक असते त्याचप्रमाणे अति वजनही गर्भधारणेत अडचणीचे ठरते.
गर्भधारण होत नसल्यास सुरुवातीला कोणते उपचार घ्यावेत ?
अनेकदा मूल होत नसेल तर थेट आयव्हीएफ ट्रीटमेंट घ्यावी लागेल असा अनेक जोडप्यांचा समज असतो. हा मोठा गैरसमज आहे. सुरुवातीला अगदी साध्या रक्ताच्या चाचण्या आणि सोनोग्राफीतही अडचणीचे निदान होऊन उपचार घेता येऊ शकतात. ते फार खर्चिकही नसतात.
मार्गदर्शन डॉ नमिता मोकाशी - भालेराव
स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, पुणे