मासिक पाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेताय? एकदा ही माहिती वाचा आणि विचार करा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:37 AM2022-08-27T10:37:15+5:302022-08-27T10:38:00+5:30
आधुनिक युगात आजही महिलांच्या मासिक पाळीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. सुशिक्षित महिलांमध्येही याविषयी पुरेशी जागरुकता नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.
मुंबई :
आधुनिक युगात आजही महिलांच्या मासिक पाळीकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. सुशिक्षित महिलांमध्येही याविषयी पुरेशी जागरुकता नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यातच उत्सव काळात मासिक पाळी पुढे ढकलण्याकडेच अनेक महिलांचा कल असतो. मात्र, या गोळ्यांचे दुष्परिणाम शरीरावर संभवतात, असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
मासिक पाळीबद्दल जनजागृती व्हावी यासाठी राज्यात अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. गणेशोत्सवाच्या आधी मासिक पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वैद्यकीय सल्ल्यानेच घ्याव्यात. काही महिलांच्या बाबतीत रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो. त्यावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या गोळ्या दीर्घकाळपर्यंत घेऊ नयेत. अन्यथा पाळीचे नैसर्गिक चक्र बिघडू शकते.
- डॉ. आरती अढे, स्त्रीरोगतज्ज्ञ, हिंदुजा हॉस्पिटल.
गोळ्यांमध्ये प्रोजेस्ट्रोन : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी ज्या गोळ्या
वापरण्यात येतात त्यात प्रोजेस्ट्रोन नावाचे हार्मोन्स असते. या गोळ्या घेतल्याने गर्भाशयाजवळील आवरण पडू न देता ते लांबवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मासिक पाळी लांबली जाते. मासिक पाळी येण्याच्या चार ते पाच दिवस आधी या गोळ्या घेतल्या जातात.
पाळी वैद्यकीय कारणांसाठी पुढे ढकलण्यासाठी हार्मोन्सच्या गोळ्या आहेत, त्या आम्ही देतो. मात्र, त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणेच अपेक्षित असते. योग्य प्रमाणात घेतल्या तर त्या फायदेशीर ठरतात, अन्यथा दुष्परिणाम दिसून येतात.
- डॉ. रोहन पालशेतकर, स्त्रीरोग तज्ज्ञ, ऑपेरा हाऊस.