झोपेच्या गोळ्या घेताहात? मग 'या' सहा गोष्ट जरूर लक्षात ठेवा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:44 AM2022-06-16T06:44:50+5:302022-06-16T06:45:19+5:30
झोप येत नाही म्हणून स्वत:च्या मनानेच झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय अनेकांना असते, याविषयीची माहिती आपण मागच्या लेखात घेतली.
झोप येत नाही म्हणून स्वत:च्या मनानेच झोपेच्या गोळ्या घेण्याची सवय अनेकांना असते, याविषयीची माहिती आपण मागच्या लेखात घेतली. मात्र कुठलीही पदवी नसताना आपण स्वत:च ‘डॉक्टर’ होणं अतिशय महाग पडू शकतं. कारण विशेेषत: झोपेच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात, जास्त दिवस घेतल्या तर त्याचे अनेक साइड इफेक्ट्स होतात. आपल्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकतं. त्यामुळे आधी डॉक्टरांचा सल्ला अत्यावश्यक. झोपेच्या गोळ्यांमुळे चक्कर येणं, गरगरल्यासारखं होणं, सारखं तंद्रीत असणं, तोंड कोरडं पडणं, नॉशिया येणं, हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-जास्त होणं, वजन वाढणं, स्मृती, परफॉर्मन्स कमी होणं, अपचन.. यासारखे अनेक त्रास झोपेच्या गोळ्यांनी होऊ शकतात. त्यामुळे या गोळ्या घेण्यापूर्वी काही गोष्टी कटाक्षानं पाळल्या पाहिजेत.
१- निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांनी दिलेल्या औषधांबाबत वेळ आणि कालावधीबाबतच्या सूचना तंतोतंत पाळा.
२- या गोळ्या घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याचे काय साइड इफेक्ट्स होऊ शकतात, याची आधीच माहिती घेऊन ठेवा. काही शंका असतील, तर त्याचं निरसन डॉक्टरांकडूनच करून घ्या.
३- झोपेच्या गोळ्या मध्येच केव्हाही घेऊ नका. झोपेच्या गोळ्यांमुळे तुमच्या जाणिवा त्या कालावधीत कमी होऊ शकतात, त्यामुळे धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते. या गोळ्या घेण्यापूर्वी दिवसभराची आपली सर्व कामं संपली आहेत ना, याची आधी खात्री करा.
४- या गोळ्या घेतल्यानंतर आता आपल्याला रात्रीची पूर्ण झोप, म्हणजे किमान सात ते आठ तास विनाव्यत्यय झोपता येईल, याकडे कटाक्षानं लक्ष द्या.
५- या गोळ्यांचे काही साइड इफेक्ट्स जाणवत असतील तर आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा. दुसऱ्या दिवशी एखादी महत्त्वाची अपॉइंटमेंट किंवा काम असेल, तर एकदम नव्या गोळ्या वापरुन पाहु नका. कारण त्यांचे साइड इफेक्ट्स आपल्याला माहीत नसतात.
६- जसं स्वत:च्या मनानं या गोळ्या घेऊ नयेत, तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनानंच त्या बंदही करू नयेत. त्यांचा डोसही कमी-जास्त करू नये.