स्वत:शी आणि पाळीव प्राण्यांशी बोलणारी माणसं वेडी नसतात भाऊ; हे वाचून व्हाल चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 11:41 AM2019-04-03T11:41:50+5:302019-04-03T11:42:18+5:30
अनेकदा लहान मुलं किंवा मुली खेळताना त्यांच्या खेळण्यांशी, बाहुल्यांशी किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांशी बोलतात. याला अनेकजण बालिशपणा समजतात.
(Image Credit : face4pets.wordpress.co)
अनेकदा लहान मुलं किंवा मुली खेळताना त्यांच्या खेळण्यांशी, बाहुल्यांशी किंवा त्यांच्या पाळीव प्राण्यांशी बोलतात. याला अनेकजण बालिशपणा समजतात. जेव्हा एखादी मोठी व्यक्ती असं करताना दिसली तर त्या व्यक्तीला लोक वेडं समजतात. अनेकजण एकट्यात स्वत:शी बोलतात. काही बाल्कनीतील झाडांशी बोलतात तर काही त्यांच्या पाळीव प्राण्यांशी मनातील गोष्टी शेअर करतात. सामान्यपणे जे लोक असं वागतात त्यांच्या विषयी एक नकारात्मक दृष्टीकोन असतो. पण अशाप्रकारे एकट्यात स्वत:शी बोलणे, झाडं-फुलांशी बोलणे, पाळीव प्राण्यांशी किंवा आवडत्या वस्तूंशी बोलणे आरोग्य चांगलं ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. याने तुमच्या आत दडलेला त्रास, वेदना, विचार कमी होतात. अर्थातच याने वेगवेगळ्या आजारांपासून सुटका मिळते.
काय सांगतात अभ्यासक?
(Image Credit : DavidWolfe.com)
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार अभ्यासकांनुसार, जे लोक नेहमी स्वत:शी बोलतात, त्यांच्या विचारात आणि समजूतदारपणात फार वाढ होते. भलेही स्वत:शी बोलणे चांगलं दिसत नसेल पण अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, याने लहान मुलांच्या वागण्याला एक वळण लागण्यास मदत मिळते. 'जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी'मध्ये प्रकाशित एका शोधात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, अशाप्रकारे स्वत:शी बोलण्याने वयस्क लोकांनाही मदत मिळते का? तर या शोधातून असे समोर आले की, स्वत:शी बोलण्याने वयस्कांमध्ये विचार, समज आणि उत्तर देण्याच्या क्षमतेत फार सुधारणा होते.
पाळीव प्राण्यांशी बोलणे
(Image Credit : Dogville Daycare & Boarding)
घरात जर पाळीव प्राणी असतील तर त्यांच्याशी बोलून बघा, त्यांच्यासमोर मन मोकळं करून बघा. कारण एका शोधानुसार, पाळीव प्राण्यांसोबत गप्पा केल्याने तुमची सामाजिक बुद्धिमत्ता दिसते. शिकागो यूनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या एका शोधानुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत बोलता तेव्हा एक आपलेपणाची जाणीव होते. आनंद मिळतो. तुम्ही एकटे असूनही एकटे राहत नाहीत. त्यामुळे पाळीव प्राण्यांशी बोला. काहीही बोला. हे असं होतं कारण ते केवळ इमानदारच असतात असं नाही तर ते एक चांगले श्रोतेही असतात. त्यांच्याशी बोलण्याने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.
भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्याशी बोला
(Image Credit : Wide Open Pets)
एका दुसऱ्या शोधात असं समोर आलं की, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाळीव प्राण्यांशी बोलणे सर्वात सोपा आणि चांगला उपाय आहे. कारण अशा एखाद्या समोर आपल्या भावना शेअर करणे सोपं असतं. कारण ते तुमच्या गोष्टींवर काही प्रतिक्रियाही देत नाहीत आणि तुम्हाला चूक किंवा बरोबरही ठरवत नाही. पाळीव प्राणी खासकरून कुत्रे हे मनुष्यांद्वारे वापरल्या गेलेल्या अनेक शब्दांना समजून घेण्यास सक्षम असतात. ते आपला आवाज, शरीराची भाषा आणि इशाऱ्यांना चांगल्याप्रकारे समजू शकतात.
जास्तीत जास्त लहान मुलांची त्यांच्या पाळीव प्राण्यांशी एक खास जवळीकता असते. ते एकट्यात त्यांच्याशी बोलतात. अशी मुलं-मुली दुसऱ्या लोकांशी नातं कायम करण्यात तरबेज असतात. खासकरून ऑटिज्म किंवा इतर शिकण्या-समजून घेण्याच्या समस्यांनी पीडित लहान मुलं मनुष्यांच्या तुलनेत पाळीव प्राण्यांशी अधिक चांगल्याप्रकारे बोलू शकतात.
स्वत:शी बोलणे
(Image Credit : projectinspired.com)
स्वत:शी बोलताना तुम्हाला कुणी पाहिलं तर अजिबातच त्यात लाजिरवाणं वाटण्यासारखं काही नाही. हे पूर्णपणे सामान्य आणि योग्य आहे. स्वत:शी बोलण्याला मानसिक आजार समजणे चुकीचे आहे. वेल्सच्या बॅगर यूनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजिस्ट पालोमा मॅरी बेफ्फा यांचं म्हणणं आहे की, जे लोक मनातल्या मनात किंवा जोरात बोलतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. मनात स्वत:शी बोलल्याने तुम्हाला स्वत:वर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. तर जोरात बोलण्याचा अर्थ असा होतो की, मेंदू योग्यप्रकारे कार्य करतो आहे. हा मानसिक आजार नाही.
मनातल्या मनात बोलल्याची मेंदू फिट ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असते. याने आपले विचार सुनिश्चित होतात आणि स्मरणशक्तीही वाढते. त्यामुळे स्वत:शी बोलणे हा कोणताही मानसिक आजार नाहीये. याने स्ट्रेस कमी होतो, आनंद मिळतो, रिलॅक्स होतं आणि मूडही चांगला होतो. म्हणजे अर्थात काय तर आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहतं.