सावधान! कॉटन कँडीमुळे कॅन्सरचा धोका; 'या' सरकारने विक्रीवरच घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 11:49 AM2024-02-18T11:49:28+5:302024-02-18T11:50:37+5:30

आपल्यापैकी अनेकांना कॉटन कँडी खाण्याची सवय असेल. काहींना तर ती प्रचंड आवडते. मात्र आता त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

tamilnadu government bans sale of cotton candy after cancer causing chemical found | सावधान! कॉटन कँडीमुळे कॅन्सरचा धोका; 'या' सरकारने विक्रीवरच घातली बंदी

सावधान! कॉटन कँडीमुळे कॅन्सरचा धोका; 'या' सरकारने विक्रीवरच घातली बंदी

आपल्यापैकी अनेकांना कॉटन कँडी खाण्याची सवय असेल. काहींना तर ती प्रचंड आवडते. मात्र आता त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तामिळनाडू सरकारने शनिवारी राज्यात कॉटन कँडीच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सरकारने कॉटन कँडीच्या विक्रीवर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे कारण फूड एनालिसिसमध्ये कॅन्सर निर्माण करणारे केमिकल आढळून आले आहेत.

कॉटन कँडीवरील बंदीबाबत माहिती देताना तामिळनाडू सरकारचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी शनिवारी सांगितलं की, कॉटन कँडीचे नमुने अन्न सुरक्षा विभागाने तपासणीसाठी पाठवले होते, ज्यामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या रोडामाइन-बी केमिकल असल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर राज्यात कॉटन कँडीच्या विक्री आणि उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिल्या कारवाईच्या सूचना

आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, अन्न सुरक्षा मानक अधिनियम, 2006 नुसार, विवाह समारंभ, इतर सार्वजनिक कार्यक्रमात रोडामाइन-बी असलेले खाद्यपदार्थ तयार करणं, पॅकेजिंग करणं, आयात करणं, विक्री करणं किंवा देणं हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा आढावा घेऊन उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुद्दुचेरीने कॉटन कँडीवर घातली बंदी 

तामिळनाडूपूर्वी पुद्दुचेरीने कॉटन कँडीवर बंदी घातली होती. कॉटन कँडीमध्ये रोडामाइन-बी आढळल्यानंतर पुडुचेरीने 9 फेब्रुवारी रोजी राज्यात त्याच्या विक्रीवर बंदी घातली होती. तसेच, लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सुंदरराजन यांनी राज्यातील कॉटन कँडी विकणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांचा साठा जप्त करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कॅन्सर आणि ट्यूमरचा धोका

रोडामाइन-बी हे पाण्यात विरघळणारं केमिकल आहे जे डायच्या रुपात काम करतं. चमकदार गुलाबी रंगासाठी ओळखले जाणारे हे केमिकल माणसांसाठी विषारी आहे. माणसांच्या शरीरात प्रवेश केल्याने पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह ताण येऊ शकतो. जेव्हा ते अन्न उत्पादनांमध्ये मिसळले जाते तेव्हा कालांतराने कॅन्सर आणि ट्यूमरचा धोका असतो.
 

Web Title: tamilnadu government bans sale of cotton candy after cancer causing chemical found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.