आता मार्केटमध्ये मिळणार ओमायक्रॉन टेस्ट किट OmiSure; किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 11:48 AM2022-01-12T11:48:47+5:302022-01-12T11:49:28+5:30
Omicron Testing Kit Omisure: ओमायक्रॉन टेस्ट किट OmiSure ही टाटा मेडिकलने विकसित केली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत देशात जवळपास पाच हजार रुग्ण आढळले आहेत. यातच एक दिलासा देणारी बातमी आली आहे की, आता जर तुम्हाला ओमायक्रॉनची लागण झाली असेल, तर तुम्ही लगेच त्याची चाचणी करू शकता. दरम्यान, आजपासून म्हणजे 12 जानेवारीपासून ओमायक्रॉनची टेस्ट किट OmiSure मार्केट आणि दुकानांमध्ये उपलब्ध होणार आहे.
ओमायक्रॉन टेस्ट किट OmiSure ही टाटा मेडिकलने विकसित केली आहे. आयसीएसआरद्वारे टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडच्या ओमायक्रॉनच्या टेस्ट किट Omisure ला 30 डिसेंबर रोजी मान्यता देण्यात आली. Omisure टेस्ट किट अन्य RT-PCR टेस्ट किट प्रमाणेच कार्य करेल. या किटच्या सहाय्याने टेस्टसाठी नाक किंवा तोंडातून स्वॅब देखील घेतला जाईल. त्यानंतर टेस्टचा फायनल रिपोर्ट 10 ते 15 मिनिटांत येईल.
OmiSure टेस्ट किटची किंमत
टाटा मेडिकलने OmiSure टेस्ट किटची किंमत प्रति टेस्ट 250 रुपये निश्चित केली आहे, जी बाजारात उपलब्ध असलेल्या इतर टेस्ट किटपेक्षा स्वस्त आहे. मात्र, टेस्टसाठी प्रयोगशाळांकडून अतिरिक्त चार्ज आकारले जाऊ शकतात, कारण ही घरगुती टेस्ट नाही.
ही टेस्ट घरी करता येत नाही
तुम्ही या किटसह घरी चाचणी करू शकत नाही, त्यामुळे प्रयोगशाळेत चार्ज स्वतंत्रपणे आकारले जाऊ शकते. टाटा एमडीची सध्या दरमहा 200000 टेस्ट किट तयार करण्याची क्षमता आहे. कंपनी ते परदेशात विकण्याचा विचार करत आहे आणि युरोपियन युनियन आणि यूएस अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला आहे.
ओडिशाने पाच लाख टेस्ट किट्सची दिली ऑर्डर
ओडिशा स्टेट मेडिकल कार्पोरेशन लिमिटेड (OSMCL) ने पाच लाख Omisure RT-PCR किट्सची ऑर्डर दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सॅम्पलध्ये ओमायक्रॉन शोधण्यासाठी Omisure ची ऑर्डर देणार ओडिशा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.