देशातील टीबीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ; भारत पहिल्या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 01:51 PM2018-12-13T13:51:30+5:302018-12-13T13:55:56+5:30
नोव्हेंबर 2018 पर्यंत देशातील टीबी रूग्णांची संख्या वाढून 18.62 लाख झाली आहे. मागील वर्षी हा आकडा 18.27 लाख इतका होता.
नोव्हेंबर 2018 पर्यंत देशातील टीबी रूग्णांची संख्या वाढून 18.62 लाख झाली आहे. मागील वर्षी हा आकडा 18.27 लाख इतका होता. आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेमध्ये लिखित उत्तरामार्फत सांगितले की, रूग्णांमध्ये सतत होणाऱ्या वाढीचं कारण म्हणजे कमी पडत असलेली उपचार यंत्रणा आहे. अशातच प्रायवेट आणि कॉर्पोरेट भागीदारी संस्थांना एकत्र घेऊन जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत उपचार पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे.
आरोग्य राज्यमंत्र्यांनी सांगितले की, भारतातील सर्व टीबी रूग्णांवर योग्य उपचार करून वर्ष 2025 पर्यंत टीबी हा आजार भारतातून मूळापासून नष्ट करण्याचा आरोग्य मंत्रालयाचा मानस आहे. आरोग्य मंत्रालयाने वर्ष 2017 ते 2025 साठी राष्ट्रीय आराखडा योजना (एनएसपी) विकसित केली आहे. ज्या शहरांमध्ये या रूग्णांची संख्या जास्त आहे. त्या शहरांमध्ये टीबीच्या रूग्णांची तपासणी, तसेच त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एक स्वतंत्र प्रणाली तयार करण्यात आली आहे.
भारतामध्ये सर्वाधिक मल्टी-ड्रग रेजिस्टेन्ट टीबीचे रूग्ण
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनच्या एका रिपोर्टनुसार, 2017मध्ये भारतात मल्टी-ड्रग रेजिस्टेन्ट टीबी (एमडीआर-टीबी) चे 24 टक्के रूग्ण आहेत. जे इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये सर्वाधिक आहेत. भारतानंतर यामध्ये चीनचा क्रमांक लागतो. चीनमध्ये सरासरी 13 टक्के आणि रूसमध्ये रूग्णांची संख्या सरासरी 10 टक्के आहे. या तीनच देशांमध्ये जगभरातील एमडीआर-टीबीचे जवळपास अर्धे रूग्ण आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनने सांगितले की, जरभरात राबवण्यात आलेल्या अनेक मोहिमांमधून वर्ष 2000 नंतर टीबीच्या जवळपास 5.4 कोटी रूग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले होते.
टीबीच्या प्रकरणांमध्ये 30 देशांच्या यादीमध्ये भारत अग्रेसर
संपूर्ण जगभरातील टीबीचे रूग्ण जास्त असलेल्या 30 देशांमध्ये भारताचा सर्वात पहिला क्रमांक लागतो. मागील वर्षी टीबीने ग्रस्त असलेल्या 1 कोटी लोकांमध्ये 27 टक्के लोकं भारतातील आहेत. 2017मध्ये संपूर्ण जगभरातील एक कोटी लोकांमधील फक्त 64 लाख लोक टीबीने ग्रस्त होती. रिपोर्टनुसार, भारत, इंडोनेशिया आणि नायजेरिया या यादीमध्ये अग्रेसर आहेत.
टीबीचे लक्षणे
टीबीचा उल्लेख झाला की, कमजोरी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे लोकांच्या डोक्यात येतात. असे समजले जाते की, रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं आहे. पण टीबी केवळ फुफ्फुसाचा आजार नाहीये. तर टीबीचं इन्फेक्शन शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतं. त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे पाहता येतील.
1. श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे
2. खोकला आला की उलटी होणे
3. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त सतत खोकला असणे
4. ताप येणे
5. शरीरात कमजोरी, वजन कमी होणे, थकवा येणे
6. कफ होणे
7. थंडी वाजून ताप येणे
8. रात्री घाम येणे
टीबी होण्याची प्रमुख कारणे
डॉक्टरांनुसार, या आजाराचं मुख्य कारण अशुद्ध पाणी आणि व्यायाम न करणे हे आहे. चांगला आहार आणि नियमीतपणे व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. तसेच तुमच्या शरीराची बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमताही वाढते. त्यासोबतच टीबी होण्याची कारणे खालीलप्रमाणे पाहता येतील.
1. धुम्रपान
2. अल्कोहोल
3. चांगला आहार न घेणे
4. व्यायाम न करणे
5. स्वच्छतेचा अभाव
6. टीबीने ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणे