झोप उडवत आहे मोबाईल; तरूणपिढी 'टेक्नोफेरेंस'च्या जाळ्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:20 PM2019-03-27T13:20:50+5:302019-03-27T13:22:10+5:30
सध्या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनचा सर्रास वापर होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक कामासाठी हातातल्या मोबाईलचा वापर करण्यात येतो. मोबाईलच्या वापराचे खरं तर अनेक फायदे आहेत पण त्याहीपेक्षा जास्त दुष्परिणामही आहेत.
(Image Credit : MIMS Community)
सध्या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनचा सर्रास वापर होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक कामासाठी हातातल्या मोबाईलचा वापर करण्यात येतो. मोबाईलच्या वापराचे खरं तर अनेक फायदे आहेत पण त्याहीपेक्षा जास्त दुष्परिणामही आहेत. त्यामुळे अनेकदा मोबाईलचा वापर कामापुरताच करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञांकडून देण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? मोबाईलच्या अतिवापराने शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाइलच्या अतिवापराने आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम होत असेल तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
18 ते 24 वयापर्यंतच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येचं म्हणणं आहे की, त्यांना मोबाइलमुळे सतत थकवा जाणव असतो. एवढचं नव्हे तर यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होत असतो. वैज्ञानिकांच्या भाषेत याला 'टेक्नोफेरेंस' असं म्हटलं जातं. टेक्नोफेरेंस म्हणजे अशी स्थिती जेव्हा मोबाईल फोनमुळे आपल्या दिनक्रमावर विपरित परिणाम होत असतात. सध्या लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत अनेक व्यक्ती टेक्नोफेरेंसच्या शिकार होत आहेत.
क्वीन्सलँड यूनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलजीने एक संशोधन केलं होतं. हा रिसर्च ऑस्ट्रेलियामधील काही व्यक्तींच्या निरिक्षणातून करण्यात आला. यामागील मुख्य उद्देश म्हणजे, खरचं मोबाईलचा उपयोग करणं हे ऑस्ट्रेलियामध्ये समस्येचं कारण बनत आहे का? या संशोधनानुसार, 24 टक्के महिला आणि 15 टक्के पुरूषांवर मोबाईलचा वापर करण्याचा वाईट परिणाम दिसून येत आहे. एवढचं नाही तर , 18 ते 24 वयोगटातील 40.9 टक्के लोक टेक्नोफोरंसने त्रस्त आहेत. तसेच 25 ते 29 वयोगटातील 23.5 टक्के लोक टेक्नोफेरेंसने त्रस्त आहेत.
संशोधकांच्या टिमने जवळपास 18 वर्षांपासून ते 83 वर्षांपर्यंतच्या 700 मोबाईल यूजर्सना या संशोधनामध्ये सहभागी करून घेतलं. या सर्वेमध्ये लोकांना विचारण्यात आलं की, खरचं मोबाईल फोनच्या वापराने त्यांची प्रॉडक्टिविटी कमी होत आहे? त्यांना थकवा येतो? यामुळे कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात का? किंवा ड्रायविंग करताना काही समस्यांचा सामना करावा लागतो का? प्रत्येक 5 पैकी एक महिला आणि 8 पैकी एका पुरूषाचं असं म्हणणं आहे की, मोबाईल फोनचा तासन्तास वापर केल्यामुळे त्यांना कमी झोप येते किंवा झोपेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच संशोधनातून अशा व्यक्तींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी एका संशोधनामधून सिद्ध झाल्या असून आम्ही त्या फक्त माहिती म्हणूनच वाचकांपर्यंत पोहोचवत असून यामधून कोणताही दावा करत नाही.