तुम्ही सदैव आशावादी असता का? आयुष्य वाढते; तणावातही होते उत्तम काम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:49 AM2022-03-12T07:49:04+5:302022-03-12T07:49:21+5:30
अमेरिकेतील पाहणीचा निष्कर्ष; आशावादी व्यक्ती तणावमुक्त राहण्यासाठी वायफळ चर्चेत वेळ घालवत नाहीत. अडचणी आल्या तरी अशा व्यक्ती पटकन चिडत नाहीत. या व्यक्ती आयुष्यात रिस्क घेण्यासाठी तयार असतात. त्यांच्यातील सकारात्मकता सातत्याने वाढते, असे या पाहणीत दिसून आले आहे.
वाॅशिंग्टन : नेहमी आशावादी राहा, आयुष्य वाढेल, असा निष्कर्ष अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीतून काढण्यात आला आहे. माणूस आशावादी असल्यास तो कितीही तणावाच्या स्थितीत अतिशय उत्तम काम करू शकतो, असेही या पाहणीतून आढळले आहे.
अमेरिकन व्हेटर्न्स अफेअर्स या संस्थेच्या वतीने या पाहणीची सुरुवात १९६० च्या दशकात झाली. त्यात २३३ युवकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यांची मनोवस्था तसेच ते कोणत्या तणावाच्या स्थितीत आहेत, याची अतिशय माहिती घेण्यात आली. ही पाहणी सुमारे चार दशके सुरू होती. त्यातील सहभागी लोकांशी विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती कशी आहे, याची माहिती घेण्यात आली.
१९८०-९० च्या दशकामध्ये या २३३ जणांमध्ये किती लोकांनी आपला आशावाद टिकवून ठेवला आहे, हेही तपासण्यात आले. आशावादी राहिल्याने त्यांच्या कार्यशैलीत किती फरक पडला, ते आपले आयुष्य किती आनंदाने जगत आहेत, त्यांना या काळात काही विकार जडले का, याबद्दलही त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. या पाहणीच्या पुढच्या टप्प्यात २००२ ते २०१० या कालावधीत सहभागी लोकांच्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल पुन्हा माहिती घेण्यात आली.
त्यातून असे लक्षात आले की, आपल्याला उद्या चांगले दिवस येतील, अशी आशा ज्यांनी मनात जिवंत ठेवली, त्यांनी खूप तणावाच्या स्थितीतही अतिशय उत्तम काम केले. असे लोक कमी आजारी पडले. मात्र, ज्यांच्या मनातील आशावाद कोमेजला होता, अशा व्यक्तींना वयाच्या चाळिशी, पन्नाशीमध्येच एकापेक्षा जास्त व्याधी जडल्या होत्या. (वृत्तसंस्था)
रिस्क घेण्यासाठी असतात सदैव तयार
आशावादी व्यक्ती तणावमुक्त राहण्यासाठी वायफळ चर्चेत वेळ घालवत नाहीत. अडचणी आल्या तरी अशा व्यक्ती पटकन चिडत नाहीत. या व्यक्ती आयुष्यात रिस्क घेण्यासाठी तयार असतात. त्यांच्यातील सकारात्मकता सातत्याने वाढते, असे या पाहणीत दिसून आले आहे.