जनुकीय रहस्यांचे दरवाजे उघडले जात आहेत... पुढे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 07:00 AM2023-05-31T07:00:31+5:302023-05-31T07:00:43+5:30
मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्म प्रमाणपत्राबरोबर त्याच्या जनुकीय मालिकेचे (जीन सिक्वेन्स) प्रमाणपत्रही तुमच्या हातात ठेवले गेले तर?
साधना शंकर,
लेखिका, केंद्रीय राजस्व सेवेतील अधिकारी
कल्पना करा, मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्म प्रमाणपत्राबरोबर त्याच्या जनुकीय मालिकेचे (जीन सिक्वेन्स) प्रमाणपत्रही तुमच्या हातात ठेवले गेले तर?
वैज्ञानिक कादंबरीत रंगवलेली ही कल्पना नसून लवकरच ते प्रत्यक्षात शक्य होणार आहे. ‘मानवी जनुक प्रकल्पा’च्या रूपाने जीवशास्त्राच्या क्षेत्रात डेटा विज्ञानाचा काळ सुरू झाला; त्याच्या फलस्वरूप १४ एप्रिल २००३ रोजी सर्वप्रथम मानवी जनुकाची मालिका
(जीन सिक्वेन्स) तयार केली गेली, त्याला आता २० वर्षे झाली आहेत. सुमारे ३ अब्ज गुणसूत्रांचा समावेश असणाऱ्या या मालिकेने एका अर्थाने मानवी अस्तित्वाचाच धांडोळा घेतला. ही अपूर्ण मालिका मुळात अनेक लोकांची गुणसूत्रे एकत्र करून तयार केली गेली असली, तरीही हे यश नवी दिशा दाखवणारे होते.
जनुकांमध्ये जीवाच्या आनुवंशिक माहितीचा संपूर्ण संच असतो. ही माहिती डीएनएच्या मालिकेत बांधली गेली की त्याला आपण जनुक म्हणतो. माणसाच्या गुणसूत्राच्या २३ जोड्यांमध्ये हे जनुक विखुरलेले असते.
जनुकशास्त्राने भूत आणि भविष्य अशा दोन्ही काळात डोकावता येईल, असे द्वार खुले केले. जीवशास्त्रातील उत्क्रांतीच्या संदर्भात हा शोध कोणी लावला, याची कल्पना केली नसेल इतकी गतिशीलता मानवी इतिहासात असल्याचा पुरावा होता. ही उत्क्रांती सरळ रेषेत जाणारी नव्हती. आता असे लक्षात येत आहे की, आपली प्रजाती निएंडरथल किंवा डेनिसोवन्स यांच्यासारख्या इतर प्रजातींच्या बरोबरीने वाढली, जगभर पसरली. तिने संस्कृती, शेती निर्माण केली. आजार आणि त्याच्याशी प्रतिकार करण्याची क्षमतासुद्धा त्यात आली.
जनुकशास्त्राचे भविष्यात काय फायदे होऊ शकतात, हे औषधनिर्माणात दिसून येत आहे. जनुकात बिघाड झाल्यास कर्करोग, हृदयविकार तसेच मधुमेह होतो. अशी जनुके आता ओळखता येतात. जनुकांवर आधारित उपचार कर्करोग तसेच सिकलसेल आजाराच्या उपचारात आजही वापरले जात आहेत. भविष्यात होणारे आजार आधीच ओळखून त्यावर उपचार करणे बाळाच्या जनुकीय मालिकेच्या मदतीने नजीकच्या भविष्यकाळात शक्य होणार आहे.
मानवी जनुक प्रकल्पाचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्याने आपल्या निष्कर्षांचे स्वामित्व घेतले नाही. उलट ते लोकांना उपलब्ध करून दिले. डेटाबेसमध्ये आता लक्षावधी लोक तसेच इतर जिवांच्या जनुकीय मालिका उपलब्ध आहेत. या प्रकल्पामुळे जनुकीय मालिका जलदगतीने तयार करणे शक्य झाले; तसेच त्यावर होणारा खर्चही घटला. मूळ प्रकल्पावर २.७ अब्ज डॉलर्स खर्च झाले. आता अवघ्या ६०० अमेरिकन डॉलर्स इतक्या खर्चात जनुकीय मालिका तयार करता येते. भारतात साधारणत: २५ हजार रुपयात संपूर्ण जनुकीय मालिका काढून घेता येते. यापुढे तो खर्च आणखी कमी होणार आहे.
या प्रक्रियेला सरासरी १०-१२ दिवस लागतात. काही अत्याधुनिक यंत्रांवर तर हे काम काही तासांत होते. मानवी जनुक प्रकल्पाची महत्त्वाची कामगिरी म्हणजे वैज्ञानिक संशोधनात सांघिक कार्य आणि सहकार्याचे किती महत्त्व आहे, हे या प्रकल्पाने दाखवून दिले. बहुकेंद्रीय सहकार्याचे हे प्रारूप आहे. १९९० साली सुरू झालेल्या या कामात २० प्रयोगशाळा सहभागी होत्या. ‘थ्री मिलियन आफ्रिकन जिनोम’ आणि ‘जिनोम एशिया १०० थाऊजंड’ हे प्रकल्पही प्रगतिपथावर असून, त्यामुळे यासंदर्भातल्या विद्येमध्ये मोठी भर पडणार आहे. या बहुविध विद्येमुळे यासंदर्भातली भाकिते अधिक अचूकपणे करण्यास मदतच होईल.
जनुकशास्त्रामुळे फार झपाट्याने महत्त्वाचे बदल होत आहेत. एखाद्या व्यक्तीचे जनुक सहजपणे स्कॅन करून क्षणात ओळखणे शक्य होईल, अशी आशा व्यक्त होत असून ही माहिती आणि अन्य घटकांच्या मदतीने विशिष्ट आजाराच्या बाबतीत कोणते औषध द्यावे किंवा काय करावे हे समजू शकेल. थोडक्यात ही संकल्पना वैद्यकशास्त्राला व्यक्तिगततेकडे नेत आहे. नव्या काळाची सगळ्यात मोठी भीती असलेली डेटा सुरक्षा आणि गुप्तता ही याही संदर्भातली डोकेदुखी असेल, यात शंका नाही.
जनुकशास्त्राचा उपयोग व्याधी निदानामध्ये अधिक वेगाने आणि अचूकपणे केव्हा शक्य होईल हे आताच सांगता येणार नाही. कारण?- निसर्ग! निसर्गाची जितकी जास्त रहस्ये उलगडत जातात, तितक्याच वेगाने अप्राप्य गोष्टीही उमजत जातातच!
(लेखिकेची मते वैयक्तिक.)