पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे!

By स्नेहा मोरे | Published: December 26, 2022 09:18 AM2022-12-26T09:18:01+5:302022-12-26T09:18:45+5:30

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे.

the interest of the patient is more important than pathy | पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे!

पॅथी कोणती, यापेक्षा रुग्णाचे हित महत्त्वाचे!

Next

स्नेहा मोरे, प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती कमकुवत आहेत, हे कोविडच्या जागतिक महामारीने आपल्याला दाखवून दिले आहे. त्यामुळे केंद्राने घेतलेल्या मिश्र पॅथीसंदर्भात वैद्यकीय शाखेच्या विविध तज्ज्ञांमध्ये असणारी संभ्रमावस्था बाजूला सारून तटस्थ राहत चिकित्सकपणे निर्णय घेण्याची गरज आहे. या सगळ्या पॅथींच्या वादात रुग्णाचा जीव मोलाचा आहे, याची जाणीव वैद्यकशास्त्राने ठेवली पाहिजे. सर्व पॅथींच्या डॉक्टरांमध्ये समन्वय, सहकार्य, सुसंवाद निर्माण करून, सकारात्मक कार्य करण्याची नितांत गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचा लढा आयुर्वेद, आयुर्वेदाच्या वैद्यांविरोधात नसून, वैद्यकीय शाखांची सरमिसळ करून बनविल्या जाणाऱ्या ‘मिक्सोपथी’ विरोधात आहे. 

आयुर्वेदातील ॲलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचीन आणि महान वैद्यकीय शाखेचा विकास खुंटवेल आणि त्याचे अस्तित्व नाहीसे करू शकेल. आधुनिक वैद्यकीय सर्जन हा शरीरशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी आणि ॲनेस्थेशियाचा सखोल अभ्यास करतो. याची तुलना आयुर्वेद अभ्यासक्रमाशी करता येणार नाही. त्यामुळे केंद्र शासनाने यासंबंधीचा निर्णय मागे घ्यावा. वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून जनतेला त्याचा जास्तीतजास्त उपयोग कसा होईल, यावर सरकारने भर द्यावा, अशी भूमिका इंडियन मेडिकल असोसिएशनचे महासचिव डॉ.जयेश लेले यांनी घेतली आहे. 

मिश्र चिकित्सा पद्धतीला (संयुक्त उपचार पद्धती) होणारा विरोध हा सर्वस्वी अयोग्यच आहे. मिश्र चिकित्सा पद्धतीमुळे रुग्णांचा फायदाच होणार आहे. प्रत्येक चिकित्सा पद्धतीची काही बलस्थाने असतात. काही कमतरताही असतात.  रुग्णांची चिकित्सा करीत असताना विविध पॅथींमधील बलस्थाने आणि कमतरता, औषधे आणि सोईसुविधांची उपलब्धता या सर्व बाबतीत समग्र विचार करून, मिश्र चिकित्सापद्धतीमुळे रुग्णांना परिपूर्ण उपचार पद्धती उपलब्ध होत असते. वैद्यक परिषदांनी निर्धारित केलेल्या व सरकारने राजपत्रात प्रकाशित केलेल्या अभ्यासक्रमानुसार ॲलोपॅथी व आयुर्वेद यांचे परिपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर, आयुर्वेदाच्या पदवीधरांनी त्या ज्ञानाचा रुग्णसेवेकरिता उपयोग करणे ही रुग्णांची फसवणूक होऊ शकत नाही. याउलट ‘मिक्सोपॅथी’सारख्या भ्रामक शब्दांचा उपयोग करीत निष्कारण रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण करणे यालाच फसवणूक म्हणावी लागेल, अशी माहिती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे डॉ.आशुतोष गुप्ता यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या होमिओपॅथीच्या परिषदेवर नियुक्त झालेले होमिओपॅथी फिजिशियन आणि फुप्फुसविकार तज्ज्ञ डॉ.जसवंत पाटील यांनी सांगितले की, मिश्रपॅथी  संदर्भात वाद न घालता, शासनाच्या निर्णयाच्या दृष्टिकोनातून संशोधन केले पाहिजे. येत्या काळात होमिओपॅथीच्या परिषदेच्या माध्यमातून मिश्रपॅथीविषयी संशोधन केले जाईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: the interest of the patient is more important than pathy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य