कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 12:43 PM2024-05-02T12:43:47+5:302024-05-02T12:44:26+5:30
covishield Dr Ravi Godse 2nd Video: कोव्हिशिल्ड ही लस घेतलेल्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका खुद्द कंपनीनेच मान्य केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर कोरोना काळात प्रसिद्धीला आलेले डॉक्टर रवी गोडसे यांनी व्हिडीओ जारी करून स्पष्ट केले होते.
कोव्हिशिल्ड ही लस घेतलेल्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका खुद्द कंपनीनेच मान्य केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर कोरोना काळात प्रसिद्धीला आलेले डॉक्टर रवी गोडसे यांनी व्हिडीओ जारी करून स्पष्ट केले होते. आता त्यांनी दुसरा व्हिडीओ जारी करत कोव्हिशिल्ड घेतली असेल तर घाबरू नका, असे सांगत पुढचा धोका सांगितला आहे.
तुम्ही कोव्हिशिल्ड घेतली असेल तर घाबरू नका. सर्वात महत्वाची असलेली गोष्ट सांगायची राहून गेली. हा काही वैद्यकीय सल्ला नाही. तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमच्या वयानुसार तुमचे रेग्युलर चेकअप चालू ठेवा. तुम्ही कोव्हिशिल्ड घेतली म्हणून क्लॉटिंगची काय रिस्क आहे हे जाणून घेण्यासाठी डीडायमर, एचआरसीटी, सीआरपी आदी टेस्ट करायची काही कुठेही सांगितलेले नाही, असे गोडसे म्हणाले.
डीडायमर या नॉन स्पेसिफिक टेस्ट असतात. सुजेमुळे ती काही लोकांची पॉझिटीव्ह येते. यानंतर डॉप्लर करा, एचआरसीटी करा मग त्यांना काहीतरी सापडते. ते सापडले की नळी घाला, सुई घाला... डॉक्टर शोधा, क्लिनिक शोधा आणि मग एखादे मजबुत झाड शोधा आणि लटका, असा धोका गोडसे यांनी स्पष्ट केला आहे. यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले आहे.
माझ्याकडे मस्त बीएमडब्लू आहे. माझ्या क्लिनिकसमोर मस्त चकचकीत शोरुम आहे. तिथे सुटाबुटात कपडे घातलेली माणसे उभी असतात. निळू फुले होते ना मराठी पिक्चरचे व्हिलन, बाई वाड्यावर या म्हणायचे. तसे ते मला पाहून म्हणतात आणि माझी कार त्यांच्या वाड्यावर घेऊन जातात. मग दोन तीन लाखांची अब्रू लुटतात. कधी चाक बदलतील, कधी इंजिनला रंग लावतील. आमच्या मॉडर्न मेडिसिनच्या लफड्यात सापडलात ना की असे सगळे होणार, असा सावध इशारा गोडसे यांनी दिला आहे.
कोव्हीशील्ड घेतलेल्या लोकांसाठी क्लॉट बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! pic.twitter.com/gYlBDyq7Ro
— DrRavi (@DrGodseRavi1) May 2, 2024
याचा अर्थ बरे वाटत नसल्यावरच डॉक्टरकडे जायचे का, प्रिव्हेंटीव्ह चेकअप वगैरे नसतो का, असतो, असेही ते म्हणाले. परंतु अमेरिकेत जेव्हा आम्ही टेस्ट करतो तेव्हा कित्येक डॉक्टरांचे पॅनेल हे ठरवत असते. भारतात हे सोपे आहे. ८०० रुपयांचा बिजनेस आहे. ५०० रुपयांची कंपनी काढायची, २०० रुपयांची कचकड्याची ब्रिफकेस आणि शंभर रुपयाची टाय... आताच तुम्ही पॅनडेमिकमधून सुटलाय काहीतरी लोड घेऊ नका, लफडी करू नका, एकदम मजेत टकाटक रहा, असा संदेश रवी गोडसे यांनी भारतीयांना दिला आहे.