अवयवदान प्रक्रियेत आता पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची; पोलिस यंत्रणेच्या समावेशासाठी प्राधिकार समितीचे पत्र
By स्नेहा मोरे | Published: December 16, 2022 07:48 AM2022-12-16T07:48:53+5:302022-12-16T07:49:14+5:30
- स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कामा व आल्ब्लेस रुग्णालयात अवयव दानाशी संबंधित कार्यरत मानवी अवयव प्राधिकार समितीने ...
- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कामा व आल्ब्लेस रुग्णालयात अवयव दानाशी संबंधित कार्यरत मानवी अवयव प्राधिकार समितीने सात महिन्यांत अवयवदानासंबंधित ४० प्रकरणे हाताळली आहेत. यात ६५ आणि ७१ वर्षीय रुग्णाच्या अवयवदानासाठी विशेष मंजुरी देण्यात आली. गुन्ह्यांचे नवे प्रकार लक्षात घेता भविष्यात या अवयव प्राधिकार समितीत पोलिस यंत्रणेची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या समावेशासाठी समितीच्या अध्यक्षांनी थेट पोलिसांनाच पत्र लिहिले आहे.
अवयव मिळविण्यासाठी प्रलोभन दाखविणे किंवा त्यावर दडपण आणणे, बळजबरी करणे या सर्व गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. समितीच्या वतीने अवयव दाता व अवयव भोक्ता, त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करून मगच त्या शस्त्रक्रियेला परवानगी देण्यात येते. कामा व आल्ब्लेस रुग्णालयांतर्गत दक्षिण मुंबई तसेच सीएसएमटी ते सायन व चेंबूर आणि चर्चगेट रेल्वे स्टेशन ते माहीम हा परिसर येतो. समितीचे अध्यक्ष कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, या समितीअंतर्गत काम करताना वैद्यकीय तज्ज्ञांप्रमाणे पोलिस यंत्रणाही आवश्यक असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा असल्यास आणखी पारदर्शक आणि अधिकृत पडताळणी करता येईल, त्यासाठी पोलिस यंत्रणेला पत्र देण्यात आले आहे.
समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. पालवे
समितीच्या अध्यक्षस्थानी कामा व आल्बलेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे असून, समिती सदस्यांमध्ये १ सहयोगी प्राध्यापक, १ मायक्रोबायोलॉजी प्राध्यापक, २ आयएमए सदस्य आणि २ आरोग्य सेवा सदस्य आहेत. ही समिती कामा रुग्णालयात कार्यरत आहे. समितीने मागील सात महिन्यांत १४ यकृत आणि २६ मूत्रपिंड दान विषयक प्रकरणे हाताळली आहेत, ही सर्व प्रकरणे मुंबईतील आहेत.