बदलला मोसम, कोंडला लहान मुलांचा ‘दम’; वातावरण बदलाचा परिणाम लहानग्यांच्या आरोग्यावर

By संतोष आंधळे | Published: August 21, 2023 07:06 AM2023-08-21T07:06:42+5:302023-08-21T07:07:00+5:30

लहान मुलांना दम लागत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे

The season has changed, children facing 'asthma' problems as Impact of climate change on children's health | बदलला मोसम, कोंडला लहान मुलांचा ‘दम’; वातावरण बदलाचा परिणाम लहानग्यांच्या आरोग्यावर

बदलला मोसम, कोंडला लहान मुलांचा ‘दम’; वातावरण बदलाचा परिणाम लहानग्यांच्या आरोग्यावर

googlenewsNext

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये खोकल्याच्या, श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या, दम लागत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पावसाच्या काळात श्वसनविकाराच्या आजारांमध्ये वाढ होत असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे जर आपल्या लहान मुलांना दम लागत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सध्या लहान मुलांमध्ये असलेल्या या समस्यांमध्ये विशेष करून पाच वर्षांखालील मुलांचा समावेश आहे. काही मुलांना तर अस्थम्यासारखी लक्षणे जाणवत आहेत. यामध्ये व्हायरल न्यूमोनिया व ब्रॉन्किओलायटीस हे दोन आजार आढळून येतात. लहान मुलांच्या आजारातील व्हायरल न्यूमोनियात जंतूच्या संसर्गामुळे फुप्फुसाच्या पेशींना सूज येते, तो विषाणूमुळे होतो. तर ब्रॉन्किओलायटीस हा लहान मुलांमधील सामान्य फुप्फुसाचा संसर्ग आहे. त्यामुळे लहान वायुमार्गांमध्ये सूज येते व लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. या लहान वायुमार्गांना ब्रॉन्किओल्स म्हणतात.

वातावरणातील बदलांमुळे मुलांमध्ये हा त्रास दिसत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यात दिसत असलेल्या लक्षणांमुळे पालकांनी घाबरून न जाता, दक्ष राहून जर काही श्वसनविकाराची गंभीर लक्षणे आढळली तर मुलांना तत्काळ डॉक्टरकडे घेऊन जावे.

सध्या अशा श्वसनविषयक आजार असलेल्या मुलांची संख्या दुपटीने वाढली आहे. काही मुलांना ताप येत नाही. मात्र अनेकांना धाप लागण्याचे प्रमाण आढळून येत आहे. विशेष म्हणजे काही मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागते. वातावरणात थंडावा आला की, परिणाम थेट लहान मुलांच्या श्वसनव्यवस्थेवर होत असतो. - डॉ. श्रुती ढाले, सहयोगी प्राध्यापक, बालरोग तज्ज्ञ (कामा हॉस्पिटल)

सध्याच्या घडीला ६० टक्के रुग्ण श्वसनविकाराशी संबंधित आहेत. १० ते २० टक्के रुग्ण हे गंभीर आजारी असून त्यापैकी ५ ते १० टक्के रुग्णांना रुग्णलयात दाखल करावे लागते. हा आजार विषाणूजन्य आहे, रुग्णांना अँटिबायोटिक्सची गरज भासत नाही. या लहान मुलांच्या उपचारांत मुलांना नेब्युलायझेशन, प्राणवायूची गरज भासत असते. त्यामुळे लक्षणांनुसार त्यांना उपचार दिले जातात. जर योग्य वेळी उपचार केले तर चांगला प्रतिसाद मिळतो. काही दिवसात रुग्ण बरे होतात. मात्र जर डॉक्टरांकडे आणायला उशीर केला तर मात्र गुंतागुंत वाढू शकते. - डॉ. इंदू खोसला, बाल श्वसनविकार तज्ज्ञ, (मॅक्स नानावटी हॉस्पिटल)

पावसाळ्यात लहान मुलांच्या श्वसनविकाराच्या व्याधी वाढतात. नाक चोंदणे, सर्दी होणे आणि सतत शिंका येणे, काही वेळेला उलट्या होतात. पालकांनी थोडा छातीवर शेक घ्यावा. सात दिवस हा आजार राहतो, त्यानंतर बरा होतो. - डॉ सुहास प्रभू, बालरोग तज्ज्ञ (हिंदुजा हॉस्पिटल)

Web Title: The season has changed, children facing 'asthma' problems as Impact of climate change on children's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.