वेळी-अवेळी येणाऱ्या जांभईचं रहस्य काय?; जाणून घ्या झोपेशी संबंध असलेल्या जांभईबद्दल रंजक गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 08:20 AM2022-02-24T08:20:58+5:302022-02-24T08:21:31+5:30
आपण थकलेलो असलो, बोअर झालेलो असलो किंवा झोप अनावर झाली की, आपल्याला जांभई येते. विशेषत: सकाळी झोपेतून उठल्यावर; झोप पूर्ण झालेली नसल्यास किंवा रात्रीच्या वेळी आपल्याला जांभया येतात.
आपण थकलेलो असलो, बोअर झालेलो असलो किंवा झोप अनावर झाली की, आपल्याला जांभई येते. विशेषत: सकाळी झोपेतून उठल्यावर; झोप पूर्ण झालेली नसल्यास किंवा रात्रीच्या वेळी आपल्याला जांभया येतात. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते ज्येष्ठ व्यक्तिपर्यंत साऱ्यांनाच जांभई येते. प्राणीही याला अपवाद नाहीत, पण झोप आणि जांभई केवळ यापुरताच हा संबंध मर्यादित नाही.
आपल्याला जांभई का येते, यासंदर्भात शास्त्रज्ञांनी केेलेलं संशोधन अतिशय महत्वाचं आहे. त्यांच्या मते जेव्हा आपल्याला झोप आलेली असते, कंटाळा आलेला असतो, अशा वेळी आपल्या मेंदूला जागृत, रिलॅक्स करण्याचं काम जांभई करते.
काही शास्त्रज्ञांच्या मते, जांभई ही आपल्यासोबतच्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. जांभई आल्यामुळे त्यांना कळतं की या व्यक्तीला आता झोप आली आहे, तो बोअर झाला आहे किंवा त्याला कसला तरी ताण आला आहे. ज्यावेळी आपण चिंताग्रस्त स्थितीत असतो, त्यावेळीही आपल्याला जांभया येण्याचं प्रमाण वाढतं. जांभई देण्यातून आपण एकप्रकारे मेंदूला शांत, रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्हाला जर दिवसाही खूप मोठ्या प्रमाणात जांभया येत असतील, तर तुमची झोप व्यवस्थित झालेली नाही किंवा तुम्हाला झोपेची समस्या आहे, हे सिद्ध होतं.
जांभया प्रत्येकालाच येतात, सर्वसामान्य व्यक्ती दिवसभरातून २८ वेळा जांभई देऊ शकते, पण दर १५ मिनिटात तुम्ही तीन किंवा चार जांभया देत असाल, तर ते शास्त्रीयदृष्ट्या ॲबनॉर्मल समजलं जातं. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं श्रेयस्कर ठरतं.
जांभई संसर्गजन्य समजली जाते. तुम्ही स्वत:ही याचा कित्येकदा अनुभव घेतला असेल. शेजारच्याला जांभई आली, तर आपल्यालाही जांभई येते. इतकंच काय, एखादा चित्रपट पाहात असताना त्यातील पात्रानं जांभई दिली, पुस्तक वाचत असताना जांभईचा उल्लेख आला, अगदी मनात तसा विचार आला, तरी आपल्याला जांभई येते. जांभई देणारी व्यक्ती जर आपल्या जवळची असेल, तर आपल्यालाही जांभई येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. जांभई देऊन त्या व्यक्तीला आपणही एक प्रकारे सहानुभूती दाखवत असतो. त्यामुळे संसर्गजन्य जांभई म्हणजे एक प्रकारे प्रेमाचं प्रतीकही आहे, असं म्हणतात!